✍🏼लोकसंवाद /- रत्नागिरी.

सह्याद्रीच्या पट्ट्यात खासगी जंगले वाचवणाऱ्या अप्लाइड एन्वारन्मेंटल रिसर्च फाउंडेशनतर्फे (एईआरएफ) आता खाडीपट्ट्यात कांदळवन संरक्षणाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. याकरिता खाडीपट्ट्यातील गावातील सरपंच, ग्रामसेवक, सदस्यांशी संवाद कार्यशाळा घेण्यात आली. या माध्यमातून जाणीव जागृतीचा प्रयत्न करण्यात आला. कांदळवन संरक्षणातून स्थानिकांचा विकास या संकल्पनेवर संस्था काम करणार आहे. आता संस्था खाडीपट्ट्यात लोकांसोबत काम करणार आहे. यापुढील काळात अभियान राबवण्यात येणार आहे.

या कार्यशाळेला तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक, पोलिस पाटील, ग्रामपंचायत सदस्य यांना या मोहिमेसंदर्भात माहिती देणारी कार्यशाळा मराठा भवन हॉलमध्ये आयोजित केली. या वेळी ५४ जण उपस्थित होते. एईआरएफ (साडवली) संस्थेमार्फत तालुकास्तरीय कांदळवन संरक्षण कार्यशाळेत गुणवंत महाजन यांनी स्वागत केले. त्यानंतर उपस्थित सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ, आणि कार्यकर्त्यांनी ओळख करून दिली.

या वेळी आसमंत बेनेवोलन्स फाउंडेशनचे नंदकुमार पटवर्धन हेसुद्धा या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित होते. त्यांनी फाउंडेशनच्या माहितीसाठी सागर महोत्सव, कांदळवन संवर्धन याविषयी सर्वांचे सहकार्य मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली. नंतर एईआरएफ संस्थेच्या संचालिका डॉ. अर्चना गोडबोले यांनी संस्थेच्या विविध उपक्रमाविषयी माहिती दिली. यामध्ये कोकणातील कोकणातील खासगी जंगलात चालणारे संस्थेचे काम याबद्दल माहिती दिली.

कांदळवनाचे असलेले अनेक फायदे महत्त्व समजावून सांगितले. स्लाइड शोद्वारे ही माहिती दाखविण्यात आला. संस्थेमार्फत अक्षय गावडे, आदिती रेणके यांनी रायगड व रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या संस्थेच्या कार्यक्रमाविषयी माहिती दिली. कार्यशाळेसाठी रत्नागिरी तालुक्यातील २१ ग्रामपंचायतीमधील सरपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटील, सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते. यामध्ये २० महिला, ३४ पुरुष उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी लांजा तालुक्याचे तहसीलदार प्रमोद कदम व त्यांचे सहकारी, इन्फिगो आय केअर हॉस्पीटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीधर ठाकूर हे देखील उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी एईआरएफ संस्थेचे सदस्य संजय पाष्टे, प्रणव पानवलकर, राजेश जाधव, महादेव सावंत, नवनाथ जगताप यांचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page