✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी.
पर्यटन क्षेत्रातील महामेरू अशी ओळख असलेल्या सावंतवाडी येथील डी के सावंत यांचे आज पहाटे मुंबईत निधन झाले.गेले काही दिवस ते दुर्धर आजाराने त्रस्त होते. त्यांच्या इच्छेनुसार त्यांचे देहदान मुंबई येथे करण्यात येणार आहे. त्यामुळे कोणत्याही पद्धतीचा धार्मिक विधी करण्यात येणार नाही असे त्यांच्या निकटवर्तीकडून सांगण्यात आले.
रेल्वे प्रवासी संघटना आणि पर्यटन क्षेत्रात श्री. सावंत यांचे मोठे योगदान होते. त्यांनी आपल्या काळात “डिंगणे व दाभीळ मामाचा गाव” ही संकल्पना डी के टुरिझम च्या माध्यमातून रुजवली होती. देशी-विदेशी पर्यटक कोकणात यावेत आणि या ठिकाणचा विकास व्हावा, रोजगार उपलब्ध व्हावे हा त्यांचा उद्देश होता. ते कायम पर्यटन क्षेत्रात मोठ्या उत्साहाने कार्यरत असत. माजगाव येथे त्यांचा डी. के हॉल प्रसिद्ध आहे.या परिसरात त्यांनी हॉटेल व्यवसाय सुद्धा सुरू केला होता. गेले काही दिवस ते आजारी होते. त्यामुळे त्यांच्यावर मुंबई येथे उपचार सुरू होते परंतु आज त्यांची प्राणज्योत मालवली. थेट आणि सडेतोड बोलण्यासाठी ते प्रसिद्ध होते. जिल्ह्याचा पर्यटन दृष्ट्या विकास व्हावा, कोकण रेल्वेला चांगले दिवस यावेत यासाठी त्यांचे नेहमी प्रयत्न केले. त्यासाठी आंदोलन, उपोषण करण्यासाठी त्यांचा नेहमी पुढाकार असे.
