सातारा येथील विभागीय स्पर्धेत जिल्ह्याचे करणार नेतृत्व
✍🏼लोकसंवाद /- कुडाळ.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व क्रीडा परिषद सिंधुदुर्ग द्वारा आयोजित कणकवली तालुक्यातील कासार्डे माध्यमिक विद्यालयच्या भव्य मैदानावर पार पडलेल्या शालेय जिल्हास्तरीय आट्यापाट्या स्पर्धेत कुडाळ तालुक्यातील रामेश्वर माध्यमिक विद्यालय बांवच्या मुलींच्या संघाने जिल्ह्यात अव्वल स्थान पटकावले असून त्यांची सातारा येथे होणा-या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
बांव विद्यालयाच्या 17 वर्षाखालील मुलींच्या संघाने फायनल मध्ये संपूर्ण सामन्यात निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करीत कुणकेश्वर हायस्कूलच्या संघावर मात करून अजिंक्यपद पटकावले.
कर्णधार अश्विनी सावंत व इतर सर्वच खेळाडूंच्या अष्टपैलू कामगिरीने संघाने जिल्हास्तरीय स्पर्धेत अजिंक्यपद पटकावले.या संघामध्ये ऋतुजा परब, ज्योती चव्हाण, तन्वी बांबुळकर, प्रीती सावंत, मृण्मयी कांबळे, रसिका बावकर, शिवानी चव्हाण, साक्षी कोचरेकर, शिवानी घोगळे, हर्षदा गावडे, आणि हर्षदा तेली या सर्व विजयी खेळाडूंचा समावेश आहे.
या यशस्वी खेळाडूंना विद्यालयाचे क्रीडा शिक्षक अनिकेत वेतुरेकर यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल विजयी खेळाडूंचे आणि मार्गदर्शक शिक्षक, व्यवस्थापक मिलिंद चव्हाण यांचे शाळेच्यावतीने मुख्याध्यापक खोत सर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी ग्रामस्थ आणि संस्थेचे अध्यक्ष अमरसेन सावंत आणि सचिव भूपतसेन सावंत यांनी खास अभिनंदन करून सातारा येथे होणा-या विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
विजयी संघाचे बांव परिसरातून विशेष अभिनंदन होत आहे.
