वेंगुर्ला /-
ग्रामीण भागातील गरजु लोकांना रोजगार मिळावा, खेड्यापाड्यातील कारागीर यांच्या उद्योगांना स्थैर्य प्राप्त व्हावे, तसेच स्वयंरोजगाराच्या क्षेत्राची व्यापक प्रमाणावर वृद्धी व्हावी, त्याचप्रमाणे कारागीरांचे तांत्रिक कौशल्य वाढविण्यास उत्तेजन देण्यासाठी व तयार मालाच्या विक्रीस मदत करण्याच्या हेतूने खादी ग्रामोद्योग मंडळाच्या माध्यमातून स्थानिक साधन सामग्रीचा वापर करून ग्रामीण भागातील कारागीरांना रोजगार मिळवुन देण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सुक्ष्म,लघु व मध्यम उद्यम मंत्रालय, भारत सरकार तर्फे प्रयत्न सुरू केले आहेत.यासाठी कोकणातील सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील उद्योगांना उर्जितावस्था देण्यासाठी सुक्ष्म उद्योग उभारणीसाठी पहिल्या पिढीच्या उद्योजकांना सक्षम बनवणारी प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ही योजना ग्रामीण भागात राबविण्यासाठी पुढाकार घेतला आहे.त्याच माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील वजराट गावात सुरु असलेल्या हातमाग व्यवसायाला भरभराटीचे दिवस येण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी खादी ग्रामोद्योगाची केंद्रीय कमिटी वजराट गावात पाठवली. त्याप्रमाणे १९५२ सालापासून आजपावेतो हातमाग व्यवसाय करत असलेले सावंत – भोसले यांच्या हातमाग व्यवसायाला भेट देऊन पाहणी केली.तसेच व्यवसायातील अडचणी समजाऊन घेऊन व्यवसाय वाढीचे मार्गदर्शन केले.येत्या महिन्याभरात खादी ग्रामोद्योगाच्या माध्यमातून वजराट गावातील महिलांसाठी प्रायोगिक तत्वावर सहा महिन्यांसाठी २५ चरखे व ५ हातमाग देण्यात येणार असुन त्यांना व्यवसायासाठी कच्चा माल पुरविण्यात येणार आहे . तसेच तयार झालेला पक्का माल खादी ग्रामोद्योग विभाग घेऊन त्याबदल्यात महिलांना कामाचा मोबदला देण्यात येणार आहे.त्यामुळे महिला वर्गात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.यावेळी खादी ग्रामोद्योग आयोग – भारत सरकार चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय हेडाऊ , महाराष्ट्र खादी ग्रामोद्योगाचे संचालक मनीष कांबळी यांनी वजराट येथील सावंत – भोसले यांच्या हातमाग व्यवसायाची पाहणी केली व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून वजराट गाव यंत्रमागाच्या व्यवसायातुन आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवुया असे ग्रामस्थांना सांगितले . यावेळी कॉनबॅकचे मोहन होडावडेकर, वजराट ग्रा.पं. सरपंच महेश राणे,उद्योजक सुधाकर भोसले,भाजपा ता.चिटनीस नितीन चव्हाण, वामन भोसले,मंगेश परब, राजन परब, विजय पेडणेकर, संतोष भोसले आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
