नवी दिल्ली /-
केंद्र सरकार सतत वाहतूक सुरक्षेच्या दृष्टीने काम करत आहे. यामुळेच काही नियमही बदलले जात आहेत. अलीकडेच मंत्रालयाने दुचाकी वाहन चालकांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे सांगितली आहेत. मागील महिन्यातच एका मार्गदर्शक सूचनेत सांगितले होते की दुचाकीच्या दोन्ही बाजूस ड्रायव्हरच्या सीटच्या मागे हॅन्ड होल्ड असावेत. मागे बसलेल्या लोकांना संरक्षण देणे हा त्याचा हेतू आहे. सध्या बहुतेक बाइक्समध्ये ही सुविधा नाही. यासह दुचाकीच्या मागे बसणाऱ्यासाठी दोन्ही बाजूंनी पायदान बंधनकारक केले आहे.
या मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटले आहे की दुचाकीच्या मागील चाकाच्या डाव्या बाजूला कमीतकमी अर्धा भाग सुरक्षितपणे झाकलेला असावा जेणेकरून मागे बसलेल्या लोकांचे कपडे मागच्या चाकामध्ये अडकू नयेत.
परिवहन मंत्रालयाने दुचाकीमध्ये हलके कंटेनर ठेवण्यासाठी देखील मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. या कंटेनरची लांबी 550 मिमी, रुंदी 510 मिली आणि उंची 500 मिमीपेक्षा जास्त नसावी. मागील सवारीच्या ठिकाणी जर कंटेनर ठेवला असेल तर केवळ ड्रायव्हरलाच मान्यता देण्यात येईल. म्हणजे दुसरा व्यक्ती त्या दुचाकीवर बसू शकणार नाही.
नुकतीच सरकारने टायरसंदर्भात देखील नवीन मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. त्याअंतर्गत जास्तीत जास्त 3.5 टन पर्यंत वजनाच्या वाहनांसाठी टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम सुचविण्यात आली आहे. या प्रणालीमध्ये सेन्सरद्वारे ड्रायव्हरला वाहनाच्या टायरमध्ये हवेच्या स्थितीची माहिती मिळते. यासह मंत्रालयाने टायर रिपेयरिंग किट्सचीही शिफारस केली आहे. हे लागू झाल्यानंतर वाहनास अतिरिक्त टायरची गरज भासणार नाही.