एमआयडीसी मधील भूखंड देण्याची आ.वैभव नाईक यांची मागणी ना.सुभाष देसाई यांनी केली मान्य..
सिंधुदुर्ग /-
एमआयडीसी मधील भूखंड देण्याची आ.वैभव नाईक यांची मागणी ना.सुभाष देसाई यांनी केली मान्य सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोविड रुग्णांसाठी लागणाऱ्या ऑक्सिजनचा तुटवडा भासू नये यासाठी जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून प्रयत्न सुरु आहेत. सिंधुदुर्गसाठी ऑक्सिजन सिलेंडर रिफील करून आणणाऱ्या ओम साई एजन्सीमार्फत कुडाळ येथे ऑक्सिजन प्लांट उभारणी करण्याचे नियोजन आहे. यासाठी लागणाऱ्या परवानग्या व प्लांटसाठी आवश्यक असणाऱ्या जागे संदर्भांत सर्वोतपरी सहकार्य केले जाणार असल्याचे जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी सांगितले आहे. कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्याशी फोनद्वारे चर्चा करून या ऑक्सिजन प्लांटसाठी कुडाळ एमआयडीसी मधील भूखंड देण्याची मागणी केली हि मागणी देखील ना. सुभाष देसाई यांनी मान्य केली आहे. कोविड रुग्णांना आवश्यक असणारे ऑक्सिजन सिलेंडर रिफील करण्याच्या नियोजनासंदर्भात आज ओरोस जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, आमदार वैभव नाईक, जिल्हा पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश जोशी, यांची बैठक झाली. यावेळी कुडाळ प्रांताधिकारी वंदना खरमाळे, एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता श्री. रेवंडकर, ओम साई एजन्सीचे दीपक कुडाळकर आदी उपस्थित होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऑक्सिजनचा सुरळीत पुरवठा होत आहे. भविष्यात ऑक्सिजनचा तुटवडा भासू नये यासाठी योग्य नियोजन केले जात आहे. ओरोस येथे एक ऑक्सिजन प्लांट कार्यान्वित असून कुडाळ महिला बाल रुग्णालय येथे देखील ऑक्सिजन प्लांट उभारणीची कार्यवाही सुरु आहे. त्याचबरोबर सिंधुदुर्गसाठी ऑक्सिजन सिलेंडर रिफील करून आणणाऱ्या ओम साई एजन्सीचे दीपक कुडाळकर यांच्या मार्फत कुडाळ येथे आणखी एक ऑक्सिजन प्लांट उभारणी करण्याचे नियोजन सुरु आहे. त्यादृष्टीने आज जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा करण्यात आली. या प्लांटच्या उभारणीसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व परवानग्या लवकरात लवकर मिळण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी सकारात्मकता दर्शविली. बैठकी दरम्यान आ. वैभव नाईक यांनी ना. सुभाष देसाई यांच्याशी चर्चा करून कुडाळ एमआयडीसी मधील भूखंड मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. परवानगी व जागा उपलब्धतेनुसार पुढील कार्यवाही करण्याचे निश्चित करण्याचे आले.