वेंगुर्ला/-
वेताळ प्रतिष्ठान गेली अनेक वर्षे सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात आपले योगदान देत असून आपल्या नाविण्यपूर्ण उपक्रमातून अनेकांना व्यासपीठ देत असते. यावेळी गावात प्रथमच दशावतार नाट्य महोत्सवाचे आयोजन करत लोककला परंपरेस चालना आणि दशावतार कलाकाराना व्यासपीठ दिले आहे. गड परिसर, सागर किनारा अशा ठिकाणी स्वच्छता मोहीम, तसेच वक्तृत्व, निबंध , चित्रकला स्पर्धाचे, क्रीडा स्पर्धाचे आयोजन करून प्रतिष्ठान सातत्याने गावासाठी व पर्यायाने जिल्ह्यात सांस्कृतिक , कला – क्रीडा – सामाजिक क्षेत्रात आदर्शवत काम करत आहे, असे गौरवोद्गार तुळस ग्रा.प.सरपंच शंकर घारे यांनी तुळस येथील वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग आयोजित दशावतार नाट्य महोत्सवाच्या उदघाटन प्रसंगी काढले.वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग च्या वतीने तुळस श्री वेताळ मंदिर येथे आयोजित पाच दिवशीय दशावतार नाट्य महोत्सवाचे उदघाटन सरपंच शंकर घारे यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर उपसरपंच सुशील परब,ग्रा.प.सदस्य जयवंत तुळसकर, शेखर तुळसकर,संजना परब,शितल नाईक,श्रद्धा गोरे, सुस्मिता बेहरे, शेखर तुळसकर, तंटामुक्ती चे अध्यक्ष दिलीप परब,दशावतार अभ्यासक वैभव खानोलकर, खानोलकर दशावतार मंडळाचे संचालक बाबा मेस्त्री, वाचनालय अध्यक्ष सगुण माळकर,निवृत्त शिक्षक बाबली परुळकर, निवृत्त पोलीस सुधीर चुडजी,अनिल रेडकर,बाळू राऊळ आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी दशावतार अभ्यासक वैभव खानोलकर आणि खानोलकर दशावतार नाट्य मंडळाचे संचालक बाबा मेस्त्री यांचा सरपंच शंकर घारे यांच्या हस्ते शाल श्रीफळ व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. कोरोना नंतर वेताळ प्रतिष्ठानने केलेल्या दशावतार महोत्सवाचे आयोजन दशावतार कलेस नक्कीच प्रेरणा व उभारी देईल आशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. खानोलकर दशावतार नाट्य मंडळ खानोली यांच्या चौरंगीनाथ या नाट्य प्रयोगाने महोत्सवाची सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी प्रेकक्षांचा महोत्सवास उदंड प्रतिसाद लाभला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. सचिन परुळकर यांनी मानले.