वेंगुर्ला /-
व्हॅलेंटाईन डे च्या नावाखाली होणारे अपप्रकार रोखण्यासाठी १४ फेब्रुवारी हा दिवस शाळा-महाविद्यालयात ‘मातृ-पितृ पूजनदिन’ म्हणून साजरा करण्यास प्रोत्साहन देण्यात यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे हिंदू जनजागृती समितीच्यावतीने तालुका जिल्हा पोलीस प्रशासन आणि वेंगुर्ला येथील खर्डेकर महाविद्यालय यांच्याकडे करण्यात आली आहे. यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या काही वर्षात १४ फेब्रुवारी हा दिवस व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा करण्याची पाश्चात्यांची प्रथा भारतातही रुढ झाली आहे.व्हॅलेंटाईन डेच्या पाश्श्वभूमीवर प्रेमाचे बीभत्स सादरीकरण करण्याच्या नावाखाली हल्ली एकतर्फी प्रेमातून मुलींची छेडछाड आणि हिंसक कृत्ये घडल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. तसेच यादिवशी होणाऱ्या मेजवान्यांमधून युवक-युवती यांच्यात मद्यपान, धूम्रपान, अमली पदार्थांचे सेवन आदी अपप्रकारांत प्रचंड वाढ झाली आहे. इतकेच नव्हे तर या दिवशी ‘लव्ह जिहाद’चा बळी बनल्याचा घटनाही घडत आहेत.
या अपप्रकारांना आळा घालण्यासाठी काही समाजसेवी संघटना मागील काही वर्षांपासून ‘मातृ-पितृ पूजनदिना’च्या माध्यमातून युवा पिढीसमोर एक आदर्श पर्याय निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. सार्वजनिक ठिकाणी आपल्या माता-पित्यांना एकत्र आणून त्यांचे पूजन करणे आणि त्यांच्याविषयी सामूहिकरित्या प्रेम व्यक्त करणे, असे या उपक्रमाचे स्वरूप असते. हे निवेदन समितीतर्फे महेश जुवलेकर, प्रविण कांदळकर, दाजी नाईक व गोपाळ जुवलेकर यांनी हे निवेदन दिले आहे.यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य विलास देऊलकर यांनी हा चांगला विषय असल्याचे सांगून तात्काळ महाविद्यालयात सध्या सुरू असलेल्या सर्व तुकड्यांमध्ये या निवेदनाचे वाचन करण्याची सूचना त्यांनी प्राध्यापकांना दिली.तसेच पोलिसांनीही हा विषय महत्वाचा असल्याचे सांगितले.