कुडाळ /-
राष्ट्रीय हरित सेना व तंबाखू प्रतिबंधक अभियान या उपक्रमांतर्गत नर्मदाबाई अनंत शिवाजी देसाई विद्यालय वालावल (ता कुडाळ) या प्रशालेतील विद्यार्थ्यांची ‘कुपीचा डोंगर’ परिसरात क्षेत्रभेट आयोजित करण्यात आली होती. राष्ट्रीय हरित सेना अंतर्गत विद्यार्थ्यांना निसर्गाबद्दल कुतूहल निर्माण व्हावे तसेच निसर्गाप्रती आदर व्यक्त व्हावा या अनुषंगाने या भेटीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये १५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यावेळी कुपीच्या डोंगरावर विद्यार्थ्यांनी रोप-वे ट्रेकिंगचा अनुभव घेतला. विशिष्ट प्रकारची झाडे, वेली यांचे नैसर्गिक संघटनही अनुभवले. श्री. शृंगारे यांच्या कलिंगड व मिरची शेतीला यावेळी भेट दिली. पाण्याची तुषार सिंचन पद्धती तसेच प्लँस्टिकचा वापर याची विद्यार्थ्यांनी माहिती घेतली.तंबाखू प्रतिबंध अभियान याअंतर्गत विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा तसेच वाईट सवयींना नाही म्हणण्याची सवय लागावी, चांगल्या गोष्टींसाठी सहकार्य करावे या उद्देशाने विद्यार्थ्यांचा विश्वास क्षेत्रभेटीतील छोट्या छोट्या घटना प्रसंगातून वाढविण्यात आला. शाळेचे शिक्षक समुपदेशक भाग्यविधाता वारंग यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. मुख्याध्यापक नारायण कोठावळे तसेच इतर शिक्षकांचे यावेळी सहकार्य लाभले.