काँग्रेसमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल करण्यात आले आहेत. काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांना महासचिव पदावरून हटविण्यात आले आहे. ते हरयाणा राज्याचे प्रभारी होते.
शुक्रवारी करण्यात आलेल्या संघटनात्मक फेरबदलामध्ये सर्वात मोठा फायदा काँग्रेसचे नेते राहुल गांधींचे निष्ठावंत रणदीपसिंह सुरजेवाला यांना झाला आहे. रणदीपसिंह सुरजेवाला यांचा आता काँग्रेस अध्यक्षांना सल्ला देणाऱ्या उच्च स्तरीय सहा सदस्यांच्या विशेष समितीमध्ये सहभाग असणार आहे. याशिवाय, रणदीपसिंह सुरजेवाला यांना काँग्रेसचे महासचिवपदी नियुक्ती केली आहे. त्यांना कर्नाटकचे प्रभारी करण्यात आले आहे. सहा सदस्यांच्या विशेष समितीमध्ये ए के अँटोनी, अहमद पटेल, अंबिका सोनी, केसी वेणुगोपाल, मुकुल वासनिक आणि रणदीप सुरजेवाला यांचा समावेश आहे.
विशेष म्हणजे, गुलाब नबी आझाद, अंबिका सोनी, मोतीलाल वोरा, मल्लिकार्जुन खर्गे यांना महासचिव पदावरून हटवले आहे. सगळ्यात महत्त्वाचे महाराष्ट्र प्रभारी बदलले आहेत. मल्लिकार्जुन खर्गे यांच्याऐवजी एच के पाटील आता महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी असणार आहेत. मल्लिकार्जुन खर्गे यांची महाराष्ट्रातून उचलबांगडी करण्यात आली आहे. मुकुल वासनिक यांच्याकडे आधी चार राज्यांचा प्रभार होता. त्यामधील तीन काढून घेण्यात आले असून एक कायम ठेवला आहे.
मधुसूदन मिस्त्री यांची केंद्रीय निवडणूक समितीच्या अध्यक्षपदी निवड केली आहे. प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेशच्या प्रभारी करण्यात आले आहे. याशिवाय, केसी वेणुगोपाल यांच्याकडे संघटनेची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेस महासचिवांमध्ये मुकुल वासनिक यांना मध्य प्रदेशची, हरीश रावत यांना पंजाबची, ओमान चांडी यांना आंध्र प्रदेशची, तारिक अन्वर यांना केरळ आणि लक्षद्वीपची, जितेंद्र सिंह यांना आसामची आणि अजय माकन यांना राजस्थानची जबाबदारी देण्यात आली आहे.
याचबरोबर, जितिन प्रसाद यांना पश्चिम बंगाल, अंदमान आणि निकोबार बेटांच्या काँग्रेसचे प्रभारी करण्यात आले आहे. जितिन प्रसाद यांच्यासाठी संघटनेतील एक मोठी झेप असल्याचे मानले जाते. विशेष म्हणजे, जितिन प्रसाद हे वादग्रस्त पत्रावर स्वाक्षरी करणाऱ्या नेत्यांपैकी एक होते. तसेच, सध्याच्या संघटनेतील बदलानंतर पवनकुमार बन्सल हे प्रभारी प्रशासन सचिव असतील. याशिवाय राहुल गांधी यांचे निष्ठावंत मानकीम टागोर यांची तेलंगणाच्या प्रभारी सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page