वेंगुर्ला /-
मुंबई विद्यापिठाच्या विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी कॉलेज, तळेरे येथे ‘विश्वविजयोत्सव‘ या क्रिडा महोत्सवांतर्गत जिल्हास्तरीय आभासी योग स्पर्धेत मारिया आल्मेडा, हर्षा खवणेकर व कस्तुरी शेटये यांनी यश संपादन केले.या स्पर्धेत तीन प्रकारचे गट होते. प्रत्येक योगासनात आसन स्थितीत एक मिनिट स्थिर रहाणे आवश्यक होते. द्वितीय वर्ष वाणिज्यची विद्यार्थीनी मारिया आल्मेडा हिने सुप्तव्रजासन, नटराजासन, पूर्णचक्रासन आदी प्रकार सादर करुन प्रथम क्रमांक पटकाविला. तृतीय वर्ष कलाची विद्यार्थीनी हर्षा खवणेकर हिने वक्रासन, वृक्षासन, परिवर्तित पार्श्वकोनासन आदी प्रकार सादर करीत तृतीय क्रमांक तर तृतीय वर्ष वाणिज्यची विद्यार्थीनी कस्तुरी शेटये हिने शशांकासन, वृक्षासन, परिवर्तित पार्श्वकोनासन सादर करीत उत्तेजनार्थ क्रमांक पटकाविला. यांना प्रा.डॉ.मुजुमदार यांचे मार्गदर्शन लाभले.यशस्वी स्पर्धकांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विलास देऊलकर, प्राध्यापक वृंद व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कौतुक केले आहे.