मालवण किनारपट्टीवर १२ व्यवसाईकांचे सिलेंडर ताब्यात …
मालवण /
मालवण सागरी किनारपट्टीवर चिवला बिच व किल्ले सिंधुदुर्ग समुद्र परिसरात बंदर विभागाने मंगळवारी स्कुबा व्यवसाईकांवर धडक कारवाई केली. १२ व्यवसाईकांचे १२ सिलेंडर बंदर अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहेत. अशी माहिती कारवाई पथकातील बंदर अधिकारी अनंत गोसावी यांनी दिली.
बोट प्रवासी वाहतूक परवाना, इन्शुरन्स, सर्वे सर्टिफिकेट आदी परवानगी व नियमांची पूर्तता न करता तसेच अनधिकृत व्यवसाय व लाईफ जॅकेट नसल्याप्रकरणी प्रादेशिक बंदर अधिकारी यांच्या आदेशानुसार कारवाई करण्यात आली. अशी माहिती गोसावी यांनी दिली. तर या कारवाई मोहिमेत आपल्या सोबत बंदर अधिकारी अमोल ताम्हणकर, उमेश महाडिक व अन्य कर्मचारी सहभागी झाले असल्याची माहिती गोसावी यांनी दिली.
पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने व्यवसाईकांनी सर्व परवानगीची पूर्तता करावी. नियमानुसार व्यवसाय करण्यात यावा. या उद्देशाने कारवाई मोहिमेत सिलेंडर ताब्यात घेण्यात आले आहेत. दंडात्मक कारवाई केल्यानंतर सिलेंडर पुन्हा व्यवसायिकांच्या ताब्यात देण्यात येतील. असेही गोसावी यांनी सांगितले.
तर आम्ही चोरीची तक्रार देऊ….
आम्ही स्कुबा व्यवसाईक सुरक्षेचे सर्व नियम पाळून व्यवसाय करतो. स्कुबा परवानगीसाठीही आम्ही वारंवार मागणी करूनही प्रशासन परवानगी देत नाही. मात्र सातत्याने कारवाई करून आम्हाला त्रास देण्याचे काम काही बंदर अधिकारी करत आहेत. आम्ही नियमात नसू तर दंडात्मक अथवा अन्य नियमात असलेली कारवाई आमच्यावर करा. मात्र आमचे साहित्य कोणत्या नियमात जप्त करता ते सांगा. अन्यथा आम्ही अधिकाऱ्यांवर साहित्य (सिलेंडर) चोरीची तक्रार पोलीस ठाण्यात करू. अशी भूमिका पर्यटन व्यवसाईक अन्वय प्रभू यांनी बंदर कार्यालयात बंदर अधिकारी अनंत गोसावी यांच्यासमोर स्पष्ट केली. यावेळी अन्य स्कुबा व्यवसाईकही उपस्थित होते. दरम्यान, कारवाई करून सिलेंडर ताब्यात दिले जातील असे गोसावी यांनी स्पष्ट केले.