स्वतःची अकार्यक्षमता उपनगराध्यक्ष व कुशे यांनी स्वतःच सिद्ध केली
मुख्याधिकारी, नगराध्यक्ष व प्रशासन एकाच नगरसेवकांचे ऐकतात. असे हतबलपणे सांगण्याची वेळ उपनगराध्यक्ष व कुशे यांच्यावर आली. त्यावरून स्वतःची अकार्यक्षमता ते स्वतःच सिद्ध करत आहेत. ‘लाली-पावडर’ लावून एसी केबिन मध्ये बसून केवळ ठेकेदारांची आणि पालिकेत येणाऱ्या जाणाऱ्यांची मापे काढण्याचा एककलमी कार्यक्रम उपनगराध्यक्ष यांनी ९ वर्षे केला. स्वतःच्या प्रभागात विकासाच्या नावाने बोंब असताना स्वतःचे ठेवावे झाकून आणि दुसऱ्याचे पाहावे वाकून अशी वृत्ती उपनगराध्यक्ष यांची झाली आहे.
सत्ताधारी म्हणून ९ वर्षे खुर्चीला चिकटुन केवळ स्वतःच्या विकास केला. मात्र प्रभागाचा विकास करण्यात उपनगराध्यक्ष अपयशी, अकार्यक्षम ठरले. केवळ राजकारण करायचे, प्रेस घेऊन नगराध्यक्ष, मुख्याधिकारी यांच्यावर आरोप करायचे. या व्यतिरिक्त शहरात स्वतः पुढकरून घेऊन उपनगराध्यक्ष यांनी कोणता विकास केला. हे जाहीर करावे. नगराध्यक्ष यांच्यावर टीका करून आपण मोठे काम केले असे त्यांना वाटत असेल तर त्यांनी तो औट घटकेचा आनंद खुशाल घ्यावा. मात्र जनता सुज्ञ आहे ती सर्वकाही जाणते. हे ही तेवढेच लक्षात घ्यावे.
एक वार्ड एक नगरसेवक हे बालिश व्यक्तव्य करून उपनगराध्यक्ष स्वतःचे अपयश वेशीवर टांगत आहेत.
गेल्या चार वर्षात नगराध्यक्ष यांना विरोध करण्यापलीकडे उपनगराध्यक्ष यांनी कोणतेही काम केले नाही. हे जनता ओळखून आहे. उपनगराध्यक्ष यांनी स्वतःच्या प्रभागातही कामे केली नाही. त्याचा जाब नागरीक विचारत असल्याने आपले अपयश लपवण्यासाठी उपनगराध्यक्ष हे नगराध्यक्ष यांच्या नावाने बोंबा मारण्याचे काम करत आहेत.
केबिनमध्ये बसून ठेकेदारांची माहिती घेणे. सतत ठेकेदारी यांच विषयावर दिवसरात्र मंथन करणे. या उपनगराध्यक्ष यांच्या कामगिरीमुळे नगरसेवक मंदार केणी यांनी ‘चॉपर गॅंग’ हे केलेले नामकरण उपनगराध्यक्ष यांना अगदी तंतोतंत जुळते.
बेपत्ता लोकप्रतिनिधी म्हणून कुशेंचा शोध सुरू
उपनगराध्यक्ष यांच्या सोबतीला आता केवळ कुशे हेच एकमेव सदस्य आहेत. आपल्याच पक्षातील अन्य नगरसेवक सोबत नाहीत यावरून उपनगराध्यक्ष व कुशे यांची कार्यक्षमता दिसून येते. प्रभागात बेपत्ता नगरसेवक अशी कुशे यांची ओळख आहे. अश्या व्यक्तीनी इतरांवर आरोप करताना मागील इतिहास पहावा. बांगीवाडा भागातील जनतेने केलेला निषेध कुशे विसरले की काय ?
मालवण शहराच्या विकासासाठी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर नेहमीच प्रयत्नशील राहिले. शहरातील ९० टक्के रस्ते एकाचवेळी डांबरीकरण श्रेय त्यांचे आहे. यासह विकासकामांची यादी मोठी आहे. अनेक कामे निविदा दरापेक्षा कमी किमतीत व दर्जेदार पद्धतीने करून घेत पालिकेचे हित जोपासण्याचे काम नगराध्यक्ष यांनी केले. बांधकाम सभापती म्हणून वर्षभर मालवण शहराची सेवा बजवताना नगराध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वच प्रभागात समान न्याय देण्याचा प्रयत्न मीही केला. मात्र काही ठराविक कामांचे कागद दाखवून एकाच प्रभागाचा विकास झाला अश्या बोंबा उपनगराध्यक्ष व कुशे मारत आहेत. शहरात झालेल्या विकासकामांची माहिती त्यांना नसल्यास आम्ही देऊ. तूर्तास एवढेच पुरे…