कोल्हापूर: आयकर विभागाची कारवाई टाळण्यासाठी तब्बल दहा लाखाची लाच स्वीकारताना कोल्हापुरातील आयकर निरीक्षक प्रताप महादेव चव्हाण याला आज, शुक्रवारी दुपारी रंगेहाथ पकडले. ही कारवाई लक्ष्मीपुरी येथे करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी, तक्रारदार हा डॉक्टर असून तो औषधांचीही निर्मिती करतो. त्याने काही महिने आयकर भरले नसल्याचे निनावी पत्र आयकर विभागाकडे आले होते. त्याची चौकशी करण्याची जबाबदारी प्रताप चव्हाण याच्याकडे होती. त्यानुसार काही दिवसांपूर्वी चव्हाण याने त्या तक्रारदाराची भेट घेतली. आयकर विभाग घरी छापा टाकणार नाही, पण त्याबदल्यात वीस लाख रुपये देण्याची मागणी त्याने केली. पण ही रक्कम जास्त होत असल्याचे सांगत तक्रारदाराने ती देण्याचे टाळले.
चव्हाण याने पुन्हा त्यांची भेट घेऊन काही रक्कम कमी करू, असे सांगितले. त्यानंतर दोघांत तडजोड होऊन १४ लाख रुपये देण्याचे तक्रारदाराने मान्य केले. त्यातील दहा लाख रुपये देताना चव्हाण यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. तक्रारदार व आयकर निरीक्षक चव्हाण हे दोघेही आपल्या खासगी वाहनातून दुपारी लक्ष्मीपुरी येथे आले. तक्रारदाराच्या कारमध्ये बसून प्रताप चव्हाण पैसे मोजत असताना त्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले.
चव्हाण हा क्रीडा विभागातून आयकर विभागात भरती झाला असून, चार-पाच वर्षांपूर्वी त्याला बढती मिळाली आहे. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्याम बुचडे यांच्यासह पथकाने केली.