कोरोनामुळे ऑनलाईन खरेदीत वाढ झाली आहे. त्यामुळे डिजिटल व्यवहारात देखील वाढ झाली आहे. यामुळे मात्र सायबर गुन्ह्यांमध्ये सतत वाढ होत आहे. नुकतेच आणखी एक ऑनलाईन फ्रॉडचे प्रकरण समोर आले आहे. एका तरूणीला सायबर आरोपींनी तब्बल ७ लाख ३४ हजार रुपयांचा गंडा घातला आहे. तरुणीने इन्स्टाग्रामवर मिळालेल्या लिंकवरुन ऑनलाईन दोन आयफोन आणि एक घड्याळ खरेदी केले. मात्र, या वस्तू तरुणीला न देता केवळ तिच्याकडून गुगल पे आणि इतर ऑनलाईन पेमेंट पर्यांयद्वारे तरुणीच्या खात्यातून ७ लाखांचा गंडा घातला. ही घटना हिमाचल प्रदेशातील मंडीमध्ये घडली असून तरूणीने याबाबत पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आयपीसी कलम ४२० अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हिमाचल प्रदेशातील मंडीमध्ये करगोस येथील कलाशन गावातील रहिवासी वसुधा रावत यांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली आहे. ९ डिसेंबरला आई-वडिलांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त त्यांना गिफ्ट द्यायचे होते. त्यासाठी तिने दोन आयफोन आणि एक घड्याळ खरेदीसाठी ऑनलाईन सर्च करायला सुरुवात केली. यावेळई तिला इन्स्टाग्रामवर एक लिंक मिळाली. त्यावर तिने दोन आयफोन आणि एक घड्याळ बुक केले. पण त्या ऑर्डरदरम्यानच एका सायबर आरोपीने इन्स्टाग्रामवर तिच्याशी चॅट करण्यास सुरुवात केली. चॅट करताना त्याने तिच्याकडे पैशांची मागणी केली. या तरूणीने गुगल पे आणि विविध खात्यांच्या माध्यमातून हप्त्यांमध्ये ७,३४,००० रुपये जमा केले. इतकी मोठी रक्कम जमा केल्यानंतरही ऑर्डर करण्यात आलेल्या वस्तूसाठी कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर तरुणीच्या वडिलांच्या खात्यातून ५० हजार आणि आईच्या ४५ हजार रुपये कट झाले. त्यानंतर त्यांना ऑनलाईन फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलिसांनी आयपीसी कलम ४२० अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील चौकशी सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page