शहरातील बंद स्ट्रीट लाईटबाबत भाजपचे नगरसेवक आक्रमक.;कार्यवाही न झाल्यास आंदोलन

शहरातील बंद स्ट्रीट लाईटबाबत भाजपचे नगरसेवक आक्रमक.;कार्यवाही न झाल्यास आंदोलन

मालवण/

मालवण शहरातील बंद स्ट्रीट लाईट बाबत नगरपालिका प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही झालेली नसून चार दिवसांवर दिवाळी आलेली असताना शहरात सर्वत्र काळोख आहे. स्ट्रीट लाईट सुरळीत करण्याबाबत दि. १२ नोव्हेंबर पर्यंत योग्य ती कार्यवाही न झाल्यास शहरात अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भाजपच्या वतीने मालवण नगरपालिकेतील भाजप नगरसेवकांनी मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

मालवण नगरपालिकेतील भाजपच्या नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांची भेट घेत शहरातील बंद स्ट्रीट लाईट बाबत लक्ष वेधले. याबाबतचे निवेदन मुख्याधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक दीपक पाटकर, नगरसेवक सुदेश आचरेकर, गणेश कुशे, आपा लुडबे, जगदीश गावकर, पूजा करलकर, ममता वराडकर, पूजा सरकारे आदी उपस्थित होते.

मालवण शहरतील स्ट्रीट लाईटच्या प्रश्नांबाबत अनेकवेळा तक्रार देऊनही तसेच नगराध्यक्ष, मुख्याधिकारी यांना लेखी निवेदने देऊनही याबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. दिवाळी चार दिवसांवर आली असताना शहरात काळोख आहे. नागरिकांच्या रोषास लोकप्रतिनिधींना सामोरे जावे लागत आहे. प्रशासन मात्र याबाबत आपला काहीच संबंध नाही याच अविर्भावात वावरत आहे. येत्या गुरुवार १२ नोव्हेंबर पर्यंत स्ट्रीट लाईट बाबत ठोस कार्यवाही न झाल्यास, आमच्या तक्रारींचे निवारण न झाल्यास अनोख्य पद्धतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा या निवेदनातून भाजपच्या नगरसेवकांनी दिला आहे.

अभिप्राय द्या..