आचरा /-
जागतिक कोरोना महामारीच्या संकटामुळे गेले काही महिने शाळा बंद असल्याने विद्यार्थी शैक्षणिक प्रवाहापासून दूर राहिले आहेत. १५ जून पासून नविन शैक्षिणक वर्ष सुरू झाले आहे. ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने मुलांचे शिक्षण गेले काही महिने सुरु आहे. शाळा बंद असल्याने व ग्रामीण भागात इंटरनेटची सुविधा नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. हे लक्षात घेऊन १०० टक्के विद्यार्थ शिक्षण प्रवाहात येण्यासाठी आचरा पिरावाडी येथील मारुती मंदिरात ‘‘शाळा बाहेरील शाळा‘‘ हा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरु करण्यात आला आहे.
हुतात्मा दत्ताराम भाऊ कोयंडे पिरावाडी या जिल्हा परिषद शाळेतील मुले तसेच इतर शाळेतील मुले व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमाद्वारे शिक्षण घेत आहेत. मात्र, काही ठिकाणी या ऑनलाइन शिक्षणात नेटवर्क अभावी बाधा येत आहे. काही विद्यार्थ्यांना मोबाईल हाताळत असताना काही अडचणीना सामोरे जावे लागत होते. विद्यार्थ्यांना शिक्षणात येणारी ही बाधा लक्षात घेत ‘शाळा बाहेरील शाळा‘ हा उपक्रम हुतात्मा दत्ताराम भाऊ कोयंडे पिरावाडी शाळा व्यवस्थापन समितीने घेतला आहे. या उपक्रमाला शिक्षणप्रेमी मिळण्यासाठी खूप अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे प्रत्यक्ष शिक्षक वर्ग आठवड्यातून तीन दिवस ठराविक वर्गाचे सोशल डीस्टनसिंगचे ठेऊन दिवसाला दोन तास मार्गदर्शन करत आहेत. यामध्ये सोमवार, बुधवार, शुक्रवारी इयत्ता पाचवी, सहावी, सातवी तर मंगळवार, गुरुवार, शनिवार तिसरी व चौथी असे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी पिरावाडी शाळेचे मुख्याध्यापक सुभाष नाटेकर, सहाय्यक शिक्षक स्मिता परब, वर्षा गोसावी, संदीप कवडे, जयमाला उदगिरे, शाळा व्यवस्थापन समितिचे अध्यक्ष नित्यानंद तळवडकर, उपाध्यक्ष भावना कुबल व समिती सदस्य, शिक्षक पालक संघ आदी परिश्रम घेत आहेत.