नवी दिल्ली /-
भारतातील सोन्याचे दर सध्या जागतिक बाजारपेठेतील या धातूच्या किमतीतील चढ-उतारानुसार निश्चित होतात. मात्र, आगामी काळात ही परिस्थिती बदलणार आहे. कारण, भारतातच इंटरनॅशनल बुलियन एक्स्चेंजची स्थापना होणार आहे. त्यानंतर या एक्स्चेंजमध्ये सोन्याचे दैनंदिन दर निर्धारित केले जाणार आहेत.
सोने आणि चांदीचे स्पॉट ट्रेडिंग करण्याची संधी व्यापारी तसेच गुंतवणूकदारांना इंटरनॅशनल बुलियन एक्स्चेंजमध्ये उपलब्ध होईल; पण याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे देशातच सोने आणि चांदीचे भाव निश्चित करण्यास यामुळे मदत होणार आहे. सध्या लंडन बुलियन मार्केट असोसिएशन (एलबीएमए) द्वारे निर्धारित करण्यात आलेल्या दरानुसार भारतात सोन्याचे दर ठरविले जातात.
आंतरराष्ट्रीय बाजारातील सट्टेबाजांमुळे सोने-चांदीच्या दरात जो चढ-उतार होतो, त्याचा फारसा फरक इंटरनॅशनल बुलियन एक्स्चेंजमुळे पडणार नाही, असे मानले जात आहे. अहमदाबादजवळ गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक सिटी (गिफ्ट) मध्ये बुलियन एक्स्चेंजची स्थापना केली जाईल. इंटरनॅशनल फायनान्शिअल सर्व्हिसेस सेंटर अॅथॉरिटीच्या देखरेखीखाली हे एक्स्चेंज उभारले जात आहे. ‘आयएफएससीए’ बुलियन एक्स्चेंजचा नियामक म्हणूनही काम पाहील. देशातील सर्व मोठ्या बँका, गोल्ड एक्स्चेंज ट्रेड फंड (ईटीएफ), ‘एमएमटीसी’सारख्या सरकारी संस्थांना बुलियन एक्स्चेंजचे सदस्यत्व दिले जाणार आहे. याशिवाय मोठमोठ्या ज्वेलर्सना सब-डीलरशिप दिली जाऊ शकते.