मालवण /-
कोरोनामुळे शाळा बंद असल्याने मालवण पंचायत समितीने विद्यालय ॲप विकसित केले आहे. या ॲपद्वारे विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण दिले जात असून विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासण्यासाठी या विद्यार्थ्यांची मूल्यमापन चाचणी घेण्याचा निर्णय पंचायत समितीने घेतला आहे. त्यानुसार येत्या ५ नोव्हेंबर रोजी मालवण तालुक्यातील विद्यार्थ्यांची ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे. ज्या ठिकाणी ऑनलाईनची व्यवस्था तांत्रिक कारणांमुळे उपलब्ध नाही, अशा ठिकाणी ऑफलाईन स्वरुपात ही परीक्षा घेतली जाणार असल्याची माहिती पंचायत समिती सभापती अजिंक्य पाताडे, उपसभापती राजू परुळेकर आणि गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी केली आहे.
यंदा शाळा सुरू करण्याचे निश्चित नसल्याने मालवण पंचायत समितीने विद्यालय ॲप सुरू करून विद्यार्थ्याना ऑनलाईन शिक्षण उपलब्ध करून दिले आहे. या अंतर्गत तिसरी ते पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. याचा विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेमध्ये सकारात्मक प्रतिसाद दिसून आला असून दर महिन्यात केंद्रप्रमुखांमार्फत सुरू असलेल्या आढाव्याअंती ७० टक्के मुलांनी चांगल्या प्रकारे ऑनलाईन अध्ययन केल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच इतर मुलांना ऑफलाईन अभ्यासक्रम पोच केला असल्याने विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनासाठी परीक्षा घेण्यात येणार आहे. येत्या ५ नोव्हेंबरला ऑनलाईन पद्धतीने ही परीक्षा घेतली जाणार असून ज्याठिकाणी इंटरनेट सुविधा उपलब्ध नाही, त्याठिकाणी ऑपलाइन स्वरूपात परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेत प्रथम तीन क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरविण्यात येणार असल्याची माहिती मालवण पंचायत समितीच्या वतीने देण्यात आली आहे.