कुडाळ /-

गेले पंधरा ते वीस दिवस संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने पिकवलेल्या भाताची नासाडी होताना पाहण्याशिवाय त्यांच्यासमोर कोणताच पर्याय नाही. अनेक वेळा मागणी करून देखील शासनाकडून अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भात शेतीचे पंचनामे होत नाहीत. गेल्या चार दिवसापासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी भातशेतीची कापणी करून सुकवायला सुरुवात केली होती. मात्र पुन्हा एकदा गेल्या तीन दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. अनेक ठिकाणी भातशेती पाण्याखाली जाऊन जमीन दोस्त झाल्यामुळे कुजलेली आहे. काही ठिकाणी कापणी करण्यात आलेल्या भाताला पुन्हा एकदा नवीन कोंब यायला सुरुवात झालेली आहे. अचानक आलेल्या पावसामुळे काही ठिकाणी भात शेती वरती किडींचा प्रादुर्भाव झाल्यामुळे भात शेती नष्ट झाली आहे. गेल्या वर्षी प्रमाणे यावर्षी देखील सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांना फार मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे. याबाबत वारंवार मागणी करून देखील सरकारकडून किंवा महसूल खात्याकडून झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आलेले नाहीत. शासन शेतकऱ्यांच्या प्रश्नावर उदासीन दिसून येत आहे. त्यामुळे पुढील आठ दिवसात नुकसानीचा सर्वे करून तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले नाहीत तर शेतकर्‍यांच्या वतीने कुजलेल्या भाताच्या पेंढ्या ह्या तहसीलदार कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालय येथे येऊन संबंधितांना भेट देण्यात येतील असे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page