▪️आठवड्यात तब्बल तीनदा देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याचा प्रयत्न..
✍🏼लोकसंवाद /- मालवण.
सिंधुदुर्गात निर्माण झालेल्या पूर परिस्थितीवेळी निलेश राणे कुडाळ, मालवणात जनतेच्या मदतीत व्यस्त असताना वैभव नाईक मात्र मुंबईत आपल्या स्वतःच्या राजकीय स्थित्यंतरासाठी भाजपा नेत्यांच्या भेटीगाठी घेण्यासाठी होते असे चिंदरकर यांनी सांगितले आहे.शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर हे सध्या मालवणचे संजय राऊत बनले आहेत. ज्या आमदारांची तळी उचलण्याचा ते प्रयत्न करीत आहेत, ते आमदार वैभव नाईक लवकरच उबाठा गट सोडणार आहेत.
मागील आठ दिवसात त्यांनी तब्बल तीनदा भाजपाचे नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळनक दावा भाजपचे मालवण तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. आ. नाईक स्वतःच्या राजकीय स्थैर्यासाठी अद्यापही प्रयत्न करीत आहेत.आपल्या या दाव्याचे पुरावे देण्यास आपण तयार असल्याचेही श्री. चिंदरकर यांनी स्पष्ट केले आहे.भाजपाच्या मालवण कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत धोंडू चिंदरकर बोलत होते.
यावेळी ते म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मागील आठ दहा दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण झाली होती. यावेळी आमदार वैभव नाईक मतदार संघात दिसून आलेत का? त्यावेळी ते स्वतःच्या राजकीय स्थैर्यासाठी आमच्या नेत्यांच्या पुढे मागे फिरत होते. तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी याबाबत आमदारांना कधीतरी याबाबत खाजगीत विचारावे. माजी खासदार निलेश राणे आणि आमदार नितेश राणे यांच्यावर बोलण्यापूर्वी स्वतःची राजकीय उंची किती आहे ते तपासावे. आमदार नितेश राणे हे विधानसभेत ज्या आक्रमकपणे आपली भूमिका मांडतात, तेवढा आक्रमकपणा वैभव नाईक सोडाच ठाकरे गटाच्या अन्य कुठल्या आमदाराकडे आहे का ? वैभव नाईक यांच्या कुडाळ मालवण मतदार संघात रस्ते, पाण्याचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. हे प्रश्न सोडविण्यासाठी आमदार वैभव नाईक यांनी कधी प्रयत्न केले आहेत का? असा सवाल धोंडू चिंदरकर यांनी केला.
