✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला.
सिंधुदुर्ग जिल्हा आंबा काजू बागायतदार संघाच्या वेंगुर्ले येथे झालेल्या सभेत आंबा, काजू बागायतदारांच्या समस्या सोडविण्यासाटी स्थानिक मंत्री व पालकमंत्री सहकार्य देत नसल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.यावेळी विविध मागण्यांसाठी १५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचे ठरले.सिंधुदुर्ग जिल्हा आंबा, काजू बागायतदार संघटनेची सभा संघटनेचे अध्यक्ष जयप्रकाश चमणकर यांच्या अध्यक्षतेखाली प्रादेशिक फळ संशोधन केंद्राच्या सभागृहात संपन्न झाली.
यावर्षी आंबा काजूचे नैसर्गिक आपत्तीमुळे फार मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. कृषि व फळ संशोधन केंद्राच्या अहवालानुसार यावर्षी फक्त 19 टक्केच पीक आल्याने आंबा काजू बागायतदार शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे हेक्टरी 50 हजार नुकसान भरपाई मिळावी, विमा हप्ता भरलेल्याना 45 दिवसाचे आत नुकसान भरपाई देणे अत्यावश्यक असताना ती अद्याप न देण्यात आल्याने या बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.यावेळी संघटना बांधणी, कल्टार वापर, खते, किटकनाशके याविषयी चर्चा करण्यात आली. मंगळवार 25 जुलै रोजी कल्टार आदी संजिवक वापर, खते, किटकनाशके याविषयी शास्त्रज्ञ, खत, किटकनाशके वितरक, आंबा, काजू बागायतदार यांचा मेळावा फळ संशोधन केंद्र येथे घेण्याचे ठरले. तसेच यावेळी कोकण कृषी विद्यापीठाचे नुतन कुलगुरू डॉ. संजय भावे यांचा सत्कार करण्याचे ठरले. या सभेस संघाच्या उपाध्यक्षा दिव्या वायंगणकर, सचिव ऍड.प्रकाश बोवलेकर, दादा आरोलकर, रविंद्र आंदुर्लेकर, सदाशिव आळवे, विरेंद्र कामत आडारकर, रतन धुरी, श्यामसुंदर राय, संदिप देसाई, बळीराम प्रभू तेंडोलकर, बाबी चिचकर, गजानन पाटकर, सुर्यकांत परब, सुरेश धुरी, एकनाथ राऊळ, यशवंत मठकर, बाबली मोर्ये, महादेव गावडे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक दिव्या वायंगणकर यांनी तर आभार ऍड. प्रकाश बोवलेकर यांनी मानले.
