✍🏼लोकसंवाद /- कुडाळ.

कडावल – भडगाव मार्गावर कडावल येथील पेट्रोल पंप नजिक मोटरसायकल स्लीप होऊन, झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या मोटरसायकलस्वार प्रतिक एकनाथ बांदेकर (वय 23, रा. मलाडवाडी भडगाव, ता. कुडाळ) याचे उपचारादरम्यान निधन झाले. हि घटना शनिवारी सायं.7.45 वाजताच्या सुमारास घडली.

कडावल ते भडगाव अशी आपल्या ताब्यातील पल्सर मोटारसायकल घेऊन प्रतिक बांदेकर भरधाव वेगाने जात होता. याच दरम्यान त्याची मोटारसायकल स्लीप होऊन, रस्त्यालगतच्या गटारात त्याच्यासह पडली. यात प्रतिकला गंभीर दुखापत झाली. याचवेळी तेथील पेट्रोल पंप येथे ट्रॅक्टर मध्ये डिझेल भरून तुषार परब ट्रॅक्टर घेऊन हिर्लोक येथे आपल्या घरी जात असताना त्यांना एक मोटरसायकलस्वार गटारात पडल्याचे • दिसून आले. त्यांनी तेथील ग्रामस्थांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर सर्वजण त्याच्या मदतीला धावले. स्थानिक ग्रामस्थांनी त्याच्या वडीलांना याबाबतची माहीती दिली तसेच त्याला कडावल प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथे त्याच्यावर प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी तातडीने ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र तेथे उपचार सुरू असताना त्याचे रविवारी पहाटे 3 वाजताच्या सुमारास निधन झाले. दरम्यान अपघाताची माहीती मिळताच कडावल पोलिस दुरक्षेत्राचे पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र दळवी व पोहेकॉ.मंगेश जाधव यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. याबाबतची खबर तुषार रमाकांत परब (रा. हिर्लोक खालची परबवाडी) यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page