✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला.

राज्य शासनाच्या २९ सप्टेंबर २०२१ रोजीच्या अन्यायकारकं सेवाप्रवेश नियम अधिसूचनेस विरोध करून गेली दीड ते पावणेदोन वर्षे पदोन्नती तसेच आश्वासित प्रगती योजनेच्या लाभापासून वंचित राहिलेल्या हिवताप विभाग कर्मचाऱ्यांनी अखेर शासनाच्या निष्क्रिय कारभाराला कंटाळून ५ जुलैपासून आझाद मैदान मुंबई येथे आमरण उपोषणाला बसण्याचा निर्धार केला आहे. जुन्या सेवाप्रवेश अधिसूचनेनुसार दहावी उत्तीर्ण व आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाकडील १२ महिन्याचे मुलभूत प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या उमेदवारांमधून निवड झालेल्या आणि सलग शासनसेवेमध्ये २० ते २५ वर्षे सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांना नवीन अधिसूचनेनुसार पदोन्नतीसाठी विज्ञान पदवी उत्तीर्ण होण्याची अट घातली असून ही शैक्षणिक अहर्ता शासनसेवेत राहून संपादन करणे शक्य नसल्याने ही जाचक अट रद्द करणे तसेच १०० टक्के पदे पदोन्नतीने भरणे अशा ग्राह्य मागण्यांसाठी संघर्ष समितीने गेली दीड वर्षे निवेदने, उपोषणे, मंत्री, सचिव यांच्याकडे पाठपुरावा करून मांडल्या आहेत. जिल्हा परिषदेकडील समान पद, समान वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पदोन्नत्या इतर लाभ जुन्या नियमानुसार देण्यात येत आहेत. ही बाब अन्यायकारक असून याबाबत शासनाकडून दखल घेतली जात नसल्याने अखेर संघर्ष समितीने उपोषणाचा निर्णय घेतला असून, याबाबत मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, संबंधित विभागांचे सचिव, आयुक्त, संचालक, सहसंचालक यांना निवेदनाद्वारे सूचित केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page