✍🏼लोकसंवाद /- दोडामार्ग.
तेरवण मेढे येथे माळरानावर चारण्यासाठी सोडलेल्या म्हैशींवर वाघाने हल्ला चढविला. यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.दरम्यान गुराख्याने आरडाओरडा केल्पळ काढला. लक्ष्मण घाटु काळे असे गुराख्याचे नाव असून ही घटना सोमवारी सायंकाळी ४:३० वा.च्या सुमारास घडली.तेरवण येथील शेतकरी लक्ष्मण काळे यांनी सोमवारी नेहमीप्रमाणे त्यांच्या म्हैशी माळरानावर चरावयास सोडल्या होत्या. सोबत ते देखील होते. सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास म्हैशींनी अचानक मोठमोठ्याने हंबरण्यास सुरुवात केली. त्यामुळे सोबत असलेल्या लक्ष्मण काळे यांनी तात्काळ धावा केला. यावेळी त्यांच्या मोठ्या म्हैशीवर एका पट्टेरी वाघाने हल्ला केला असून म्हैशीची मान त्या वाघाच्या जबड्यात असल्याचे त्यांनी पाहिले. वाघाला पाहून त्यांची भीतीने गाळण उडाली. शिवाय इतर दोन म्हैशी जिवाच्या भीतीने जंगलात इतरत्र पळाल्या.काळे यांनी जोरजोरात आरडाओरडा केल्याने वाघाने म्हैशीला सोडून जंगलात धूम ठोकली. म्हैशीच्या मानेखाली वाघाचे दात लागल्याने मोठा रक्तस्त्राव सुरू होता. लक्ष्मण काळे यांनी पळालेल्या दोन म्हैशींसहीत जखमी म्हैशीला घरी आणले. सध्या तिच्यावर उपचार सुरु असल्याचे लक्ष्मण काळे यांच्या मुलाने सांगितले.
