✍🏼लोकसंवाद /- कुडाळ.

” मातृभाषा मराठीने मला घडविले म्हणून मी लोककलेचा पाईक होऊ शकलो. लोककलेमार्फत मातृभाषा मराठीचे सांस्कृतिक ठेवा जतन करण्याचे भाग्य लाभले. असे उद्गार पद्मश्री परशुराम गंगावणे यांनी काढले ते बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये सुलेखनकार सुमित दाभोलकर मित्र मंडळ व बॅ नाथ पै शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने राजभाषा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमांमध्ये प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.

त्यांनी आपल्या पुढील मनोगतामध्ये मातृभाषेचे जीवनातील स्थान, मातृभाषेचा गोडवा याबद्दल मनोगत व्यक्त करत आपल्या पद्मश्री पुरस्कारापर्यंतच पोहोचण्यासाठी कोणकोणत्या दिव्यातून जावे लागले हे सांगत मातृभाषेचा त्यामध्ये असलेला वाटा उपस्थितांसमोर कथन केला. मराठी आपली मातृभाषा असल्याचा आपल्याला गर्व आहे. आणि सर्वांनी तो बाळगावा. असे सांगत राजभाषा दिनानिमित्त सर्व मराठी भाषिकांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी त्यांच्यासोबत व्यासपीठावर कळसुत्री बाहुल्यांची कला जोपासत अमोल कार्य केलेले राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त लोक कलाकार गणपत मसगे, सिंधुदुर्ग तरुण भारतचे आवृत्तीप्रमुख शेखर सामंत, बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर, ज्येष्ठ लेखिका वृंदा कांबळे, सुलेखनकार सुमित दाभोलकर, सिनेमा मॅटोग्राफर विनीत सामंत, व्हिडिओ एडिटर प्रथमेश धुरी इत्यादी उपस्थित होते.

कुसुमाग्रजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राज्यकारभाराची भाषा मराठी ठेवून तिची जपणूक केली त्याच्याबद्दल ऋण व्यक्त करत त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

या कार्यक्रमानिमित्त बोलताना राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त गणपत मसगे यांनी “जेथे जातो तेथे मातृभाषा माझी सांगाती” आणि त्यामुळेच आपल्याला कोणत्याही ठिकाणी बोलताना अडचण वाटली नाही. मराठी सारखी नितांत सुंदर भाषा आपली मातृभाषा असल्याबद्दलचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. संत ज्ञानेश्वर पासून ते आज पर्यंत मातृभाषेच्या जडणघडणीमध्ये असलेल्या सर्वांच्या योगदानामुळे आज मराठी भाषा आणि मराठी भाषेमधील लोककला समुद्रापार गेलेली आहे”. असे सांगत आपणास या जागतिक राजभाषा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात निमंत्रित केल्याबद्दल धन्यवाद व्यक्त केले.

तरुण भारतचे सिंधुदुर्ग जिल्हा आवृत्तीप्रमुख शेखर सामंत यांनी बोलताना ” बुद्धिमान माणसाला आपलं यश संपादन करण्यासाठी भाषेची मर्यादा पडू शकत नाही आणि मातृभाषेची तर नाहीच नाही .असं सांगत भूषण गगराणी पासून राजीव पांडे, पणदूर हायस्कूलचा विद्यार्थी चव्हाण, प्राजक्ता ठाकूर, सुब्रमण्यन केळकर अशा विविध आयपीएस अधिकाऱ्यांनी मराठीतील भाषेद्वारे यूपीएससी आयपीएस परीक्षा मध्ये प्राविण्य मिळवले.याची आठवण करत त्यांच्या कामगिरीचं कौतुक केले. आपणही आपल्या प्रगतीसाठी इंग्रजीचा ध्यास अवश्य घ्यावा ;परंतु मातृभाषा मराठीचे सांस्कृतिक संचित जतन करत पुढे जाऊया “.असे सांगत या देखण्या कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर व सहकारी यांचे कौतुक करत समाधान व्यक्त केलं.

यावेळी ध्वनीचित्र सुलेखनकार सुमित दाभोलकर , विनित सामंत, प्रथमेश धुरी यांनी मराठी अभिमान गीताच्या पार्श्वभूमीवर मराठी बाणा व मराठी संस्कृती जपत विशेष कार्य केल्याबद्दल उमेश गाळवणकर, शेखर सामंत, राजीव बिले, प्रणय तेली, राजान नाईक, वृंदा कांबळी, माय ओन जर्नी टीमचे पदाधिकारी, रोटरी क्लबचे पदाधिकारी ,फाईन आर्ट चे शिक्षक सिद्धेश नेरुरकर, स्वराली साळसकर, अन्वी माने ,सिंगिंग स्टारचे कलाकार, एजीएम स्टुडिओचे फोटोग्राफर्स ,लोक कलाकार गणपत मसगे, सुमेध लॅबचे कर्मचारी , पद्मश्री परशुराम गंगावणे, आशीर्वाद फोटो स्टुडिओचे फोटोग्राफर ,शिवप्रेमी सिंधुदुर्गचे कार्यकर्ते -पदाधिकारी- मालक ,गायक सागर कुडाळकर यां सिंधुदुर्ग पुत्रांचा विशेष पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान व सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमांमध्ये मराठी भाषेची थोरवी कथन करणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रम ही सादर करण्यात आला. त्यामध्ये गणेश वंदना, मराठी भाषेची थोरवी वर्णन करणारे नृत्य व मराठी भाषा बद्दल गौरव व्यक्त करणारे स्कीट नर्सिंग महाविद्याल, महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थीनींनी आणि व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थीनीनी सादर केले.

कार्यक्रमात उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांना बॅ नाथ पै शिक्षण संस्था यांच्या तर्फे शाल, श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुमित दाभोलकर यांनी केले तर कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन प्रा.प्रणाली मयेकर यांनी केले

(याचवेळी बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेच्या विविध अभ्यासक्रमात तर्फे कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मराठी भाषेची थोरवी वर्णन करणाऱ्या मनोगतातून मराठी राजभाषा दिन ही उत्साहवर्धक वातावरणात साजरा करण्यात आला)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page