✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला.
किरकोळ भांडणातून पतीने कोयत्याने पत्नीच्या डोक्यात वार केल्याचा प्रकार होडावडा येथे घडला आहे.यात पत्नीला गंभीर दुखापत झाली आहे. ही घटना आज सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास होडावडा-ख्रिश्चनवाडी परिसरात घडली. याप्रकरणी पत्नीने दिलेल्या तक्रारीनुसार पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पवित्रा कोचरेकर (वय ३२) असे त्यांचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पती प्रकाश कोचरेकर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी व संशयित हे दोघे पती-पत्नी असून त्यांचे नेहमी कौटुंबिक वाद होतात. यापूर्वी त्यांनी एकमेकांना मारहाण केल्याचा प्रकार घडला होता. दरम्यान आज सकाळी घराच्या पाठीमागे असलेल्या पडवीत सौ पवित्रा यांनी तांदूळ वेचून ठेवले होते. यावेळी बाहेरून आलेल्या प्रकाश यांनी किरकोळ कारण काढून तांदळाच्या डब्यावर लाथ मारून ते तांदूळ टाकून दिले. यावेळी पवित्रा यांनी विचारणा गेली. यावेळी संतप्त झालेल्या प्रकाशने बाजूला असलेला धारदार कोयता घेऊन त्यांच्या डोक्यावर व मानेवर वार केले. यात त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना अधिक उपचारासाठी तुळस प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. याबाबतचा गुन्हा वेंगुर्ले पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. याबाबतची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी सोळंके व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. याबाबतचा अधिक तपास पोलीस निरीक्षक अतुल जाधव करीत आहे.
