✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला.
गावमौजे मठ ता. वेंगुर्ला जि. सिंधुदुर्ग येथील श्रीम. तिलोत्तमा यशवंत सावंत हिचा दि. ०१/०८/२०१९ रोजी राहत्या घरी म्हणजेच मठ कोल्ह्याचे भाटले येथे संशयास्पदरित्या मृत्यु झाला होता. सदर मृत्युची नोंद वेंगुर्ला पोलिसांनी आकस्मिक मृत्यु अशी केली होती परंतु मयत श्रीम. तिलोत्तमा सावंत हिचा मुलगा श्री. अनंत यशवंत सावंत याने आपल्या आईचा मृत्यु आकस्मिक नसुन तिचा खुन झालेला आहे असा संशय व्यक्त केला होता व संशयीत म्हणुन श्री. सुधीर उर्फ बाबल्या बाळु गावडे रा. चौकुळ, सावंतवाडी, ता. सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग याचे नाव देखील पोलिसांना सांगितले होते. परंतु वेंगुर्ला पोलिसांनी सदर व्यक्तीवर गुन्हा नोंद केला नव्हता. सबब मयत श्रीम. तिलोत्तमा सावंत हिच्या मुलाने त्यावेळेचे तात्कालीक वेंगुर्ला पोलिस निरीक्षक यांच्याकडे तशी लेखी तक्रार केली होती परंतु वेंगुर्ला पोलिसानी त्याची दखल न घेतल्याने श्री. अनंत सावंत यांनी पोलिस अधिक्षक सिंधुदुर्ग यांच्याकडे लेखी तक्रार केली होती परंतु पोलिस अधिक्षकांनी देखील कोणतीही दखल न घेतल्याने फिर्यादी श्री. अनंत यशवंत सावंत यांनी श्री. सुधीर उर्फ बाबल्या बाळू गावडे याच्या विरुद्ध गुन्हा नोंद व्हावा ह्याकरीता अॅड. श्री. मनीष सातार्डेकर व अॅड. श्री. सागर ठाकुर याच्यामार्फत वेंगुर्ला न्यायालयामध्ये फौजदारी अर्ज दाखल केला होता सदरचा अर्ज वेंगुर्ला न्यायालयाच्या न्यायाधीश श्रीम. के. के. पाटील यांनी दि. ०६/०१/२०२३ रोजी मंजुर केला व सदर प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश वेंगुर्ला पोलिसांना दिले आहेत.
थोडक्यात हकीगत अशी की, श्रीम. तिलोत्तमा यशवंत सावंत ही तिच्या राहत्या घरी एकटीच राहत असे व तिचे तिन्ही मुलगे कामानिमित्त मुंबई येथे राहत असत. असे असता दि. ०१/०८/२०१९ रोजी श्री तिलोत्तमा यशवंत सावंत हिचा संशयास्पदरित्या राहत्या घरी मृत्यु झाला होता. श्रीम. तिलोत्तमा सावंत हिचा मृत्यु होण्याच्या आधी दोन दिवस फिर्यादी म्हणजेच श्री. अनंत यशवंत सावंत याच्या संख्या काकीच्या बहीणीचा मुलगा श्री. सुधीर उर्फ बाबल्या बाळु गावडे हा सुमारे चौदा ते पंधरा वर्षानी मयत श्रीम. तिलोत्तमा सावंत हिला व त्यांच्या मुलांना कोणतीही कल्पना न देता त्याच्या घरी राहण्यासाठी आला होता व त्याचे वागणे संशयास्पद असल्याचे मयत श्रीम. तिलोत्तमा सावंत हिने तिच्या तिन्ही मुलांना म्हणजेच श्री.अनंत यशवंत सावंत, श्री. श्रीकृष्ण यशवंत सावंत, श्री. संदिप यशवंत सावंत यांना याबाबत कल्पना दिली होती.
असे असता श्रीम. तिलोत्तमा यशवंत सावंत हिचा संशयास्पदरित्या मृत्यु झाला त्यावेळी तिच्या अंगावर मारहाणीच्या खुणा दिसत होत्या तसेच तिच्या गळ्याभोवती नखे लागल्यासारखी दिसत होती तसेच तिच्या गळ्यातील सोन्यांची १०) ग्रॅम वजनाची माळ व पैसे असलेली उशी चोरुन नेल्याचे प्रथम दर्शनी आढळुन आले होते. त्यामुळे श्री. अनंत यशवंत सावंत यांनी आपल्या आईचा सोन्याच्या माळेसाठी व पैशांसाठी खुन झालेला आहे अशी तक्रार त्यावेळीचे तात्कालीक पोलिस निरीक्षक वेंगुर्ला यांच्याकडे केली होती परंतु त्यांनी कोणतीही कारवाही न केल्याने श्री. अनंत सावंत यांनी त्यावेळेचे तात्कालीक पोलिस अधिक्षक सिंधुदुर्ग यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. परंतु त्याच्याकडुन देखील कोणतीही कारवाही न झाल्याने अखेर फिर्यादी श्री. अनंत यशवंत सावंत यानी अॅड. श्री. मनीष सातार्डेकर याच्यामार्फत वेंगुर्ला न्यायालयामध्ये सदर व्यक्तीवर गुन्हा नोंद होण्याबाबत फौजदारी अर्ज दाखल केला होता. सदर फौजदारी अर्जामध्ये अॅड. श्री. मनीष सातार्डेकर यांनी फिर्यादी याची योग्य बाजु मांडुन सदरचा मृत्यु हा आकस्मिक नसुन खुन झाल्याचा संशय व्यक्त केला होता व त्याअनुषंगाने आपला युक्तीवाद में, कोर्टात मांडला होता व फिर्यादी याची भक्कम बाजु कोर्टासमोर मांडली होती. सबब अँड. श्री. मनीष सातार्डेकर यांनी फिर्यादीच्या वतीने केलेला युक्तीवाद ग्राह्य मानून वेंगुर्ला न्यायालयाने दि. ०६/०१/२०२३ रोजी आदेश पारीत करुन श्रीम. तिलोत्तमा सावंत हिचा मृत्यु आकस्मिक नसुन खुन झाल्याचा संशय निर्माण होत आहे असे मत व्यक्त करुन सदर प्रकरणाची सखोल चौकशी करण्याकरीता वेंगुर्ला पोलिसांना तसे आदेश देण्यात आले होते. सबब वेंगुर्ला पोलिसांनी आरोपी श्री. सुधीर उर्फ बाबल्या बाळु गावडे याच्याविरुध्द गुन्हा नोंद केला असुन त्याचा अधिक तपास वेंगुर्ला पोलिस करत आहेत. सदर प्रकरणी फिर्यादीच्या वतीने अॅड. श्री. मनीष सातार्डेकर यांनी काम पाहिले व त्यांना सदर प्रकरणी अॅड. श्री. सागर ठाकुर व अॅड. कु. अक्षदा राऊळ यांनी चांगले सहकार्य केले. सदर प्रकरणी आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद झाल्याने फिर्यादी श्री. अनंत यशवंत सावंत यांनी समाधान व्यक्त केलेले आहे. तसेच उशीराक होईना परंतु आपल्याला न्याय मिळाला आहे अशी भावना त्यांनी व्यक्त केली असुन सदर प्रकरणी फिर्यादीची भक्कम बाजु कोर्टासमोर मांडल्याबाबत अॅड. श्री. मनीष सातार्डेकर, अॅड. श्री. सागर ठाकुर व अॅड. कु. अक्षदा राऊळ यांचे आभार मानले आहे तसेच न्यायालयाच्या आदेशामुळे आपला न्यायदेवतेवरील विश्वास अधिक वृध्दिंगत झाल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे व न्यायालयाचे देखील आभार मानले आहे.
