देवगड /-

सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाची मासिक सभा शिक्षक भवन देवगड येथे जिल्हाध्यक्ष श्री. रमण शंकरराव वायंगणकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी जानेवारी २०२३ पासून भंडारी समाजाची कुटुंब जनगणना कार्यक्रम सुरु करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.
महासंघाचे जिल्हाध्यक्ष रमण वायंगणकर माहिती देताना म्हणाले की,  सदर कुटुंब जनगणनेचे काम यश फाऊंडेशन कुडाळ या रजि.कंपनीला देण्यात आले असून सदर कंपनी दि.१ जानेवारी २०२३ पासून सर्व तालुक्यात प्रत्येक गावात घरोघरी जाऊन भंडारी समाजातील लोकांची परिपूर्ण माहिती गोळा करण्याचे काम सुरु करणार आहे. त्यासाठी महासंघाने आपल्या रजिस्टर शिक्याचे फॉर्म तयार केले असून त्या कुटुंबास महासंघामार्फत ओळखपत्र देण्यात येणार आहे. सदर माहिती ही महासंघाच्या दप्तरी संग्रहित ठेवली जाणार असून समाजातील गरजू लोकांना त्यांच्या पात्रतेनुसार रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी महासंघ मदत करणार आहे. महासंघाच्या अधिकृत पत्राप्रमाणे यश फाऊंडेशनचे पदाधिकारी माहिती गोळा करण्यासाठी आपल्याकडे येणार आहेत, त्यांना जिल्ह्यातील सर्व भंडारी बांधवांनी सहकार्य करावे, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाने आवाहन केले आहे.यावेळी या सभेत सर्व विषयावर विषयवार चर्चा करून निर्णय घेण्यात आले. देवगड येथील भंडारी बांधव  पंढरीनाथ आचरेकर यांनी ४१ वेळा रक्तदानाचे काम केल्याबद्दल त्यांचा महासंघाच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच सभेच्या सुरुवातीस देवगड तालुक्यात प्रथमच महासंघाची सभा होत असल्याने तालुका भंडारी मंडळाचे अध्यक्ष प्रल्हाद मालवणकर यांच्या हस्ते जिल्हाध्यक्ष रमण वायंगणकर यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी देवगड तालुकाध्यक्ष प्रल्हाद मालवणकर, कार्याध्यक्ष हेमंत करंगुटकर, विलास करंजेकर, विकास वैद्य, मनोहर पालयेकर, मामा माडये, लक्ष्मीकांत मुंडये, सुनिल बिर्जे, रमाकांत पेडणेकर, सुधीर मांजरेकर, पंढरीनाथ आचरेकर, बाळकृष्ण मांजरेकर, विलास रूमडे आदी समाज बांधव उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page