पुणे /-
राज्यात भाजप-शिवसेना युतीचं सरकार आलं असतं तर काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष औषधालाही उरला नसता, असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ते पुणे जिल्ह्यातील पुरंदर येथील शेतकरी जनसंवाद मेळाव्यात बोलत होते. यावेळी त्यांनी बंड का केले याबद्दलही माहिती सांगितली.
मुख्यंमत्री म्हणाले, अनेकजण म्हणातात की, एकनाथ शिंदेंनी पाप केले. पण 30-40 आमदार सातत्याने माझ्याकडे येत होते. त्यांचे दु:ख सांगायचे. राष्ट्रवादीकडून होणार त्रास सांगत होते. त्यामुळे राज्य वाचवण्यासाठी आणि राज्याचा विकास करण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला. आम्ही जर बंड केले नसते तर पुढे होणाऱ्या निवडणुकीत शिवसेनेचे बोटावर मोजण्याइतकेच आमदार निवडून आले असते. सगळे पराभूत झाले असते. सत्तेतले प्रमुख पदाधिकारी (राष्ट्रवादी काॅंग्रेस) भूमिपूजन करू लागले, उद्घाटन करू लागले.. आमचे शिवसैनिक त्यांच्याकडे नुसते पाहत होते. मोठ्या प्रामाणात निधी राष्ट्रवादी काॅंग्रेसला मिळत होता. राष्ट्रवादीचे नेते शिवसैनिकांना फोडत होते. त्यांच्या पक्षात जाण्यासाठी आमिष दाखवत होते. त्यामुळे सर्व आमदार माझ्याकडे येऊन दु:ख सांगत होते. त्यामुळे हा निर्णय घेतल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
दरम्यान, या मेळाव्याला शिवाजी आढळराव पाटील, बाळा भेगडे, शरद सोनावणे, दिलीप यादव, आमदार भिमराव तापकीर, विजय शिवतारे, शहाजी बापू पाटील, उदय सामंत यांसह आदी नेते उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी हा दौरा सुरु असल्याचेही शिंदे यांनी सांगितले. नाशिक, संभाजीनगर, पुणे या दौऱ्यांमध्ये नागरिकांशी संवाद साधला, अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानाचे पंचनामे, जीवीत हानी, घरांची पडझड यांचा आढावा घेण्यात आला. संबंधित विभागाला तातडीने प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.