ब्युरो न्युज /-
श्रीलंकेमध्ये आज नव्या राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक झाली. यात श्रीलंकेचे काळजीवाहू राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे निवडून आले. काळजीवाहू राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांच्याशिवाय दुल्लस अल्हप्पारुमा आणि अनुरा कुमारा दिसानायके हे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात होते.
२२५ सदस्य असणाऱ्या श्रीलंकेच्या संसदेत बहुमत मिळवण्यासाठी ११३ मतांची आवश्यकता होती. रानिल विक्रमसिंघे यांना स्पष्ट बहुमत मिळालं असून त्यांना १३४ मते मिळाली. आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या श्रीलंकेसमोर कर्जाचा डोंगर असून यासंदर्भात नवीन राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांना आंतरराष्ट्रीय नाणेनिधीशी चर्चा करून, मदत मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. सध्या देशातील दोन कोटी २० लाख लोक इंधन, गॅस, दुधाची पावडर अशा जीवनावश्यक वस्तूंच्या टंचाईला तोंड देत आहेत.