कुडाळ /-
शहरातील बस डेपो नजीकच्या मुंबई गोवा महामार्गावरील ओव्हरब्रीजवर झालेल्या अपघातात युवक ठार झाला. संदीप अनिल जाधव (रा. पावशी, २७ ) असे मृताचे नाव आहे. बुधवारी रात्री ८. ३० च्या सुमारास हा अपघात घडला. या अपघातानंतर कुडाळ शहरातील वातावरण तंग झाले होते.संदीप हा आपल्या ताब्यातील दुचाकीवरून पावशी येथे आपल्या घरी निघाला होता. महामार्गावर पाणी साचलेल्या ठिकाणी दगड ठेवण्यात आले आहेत. संदीपची दुचाकी या दगडाला धडकली आणि त्याचा दुचाकीवरील ताबा सुटला. यात रस्ते दुभाजकावर आदळून तो गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. संदीप हा विवाहित असून त्याला एक मुलगा सुद्धा आहे.महामार्ग विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे हा अपघात झाल्याचा आरोप करीत स्थानिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. महामार्गावर मनमानी पद्धतीने उपाययोजना करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, अशी मागणी स्थानिकांनी केली. मृत संदीप हा उत्कृष्ट ट्र्क चालक होता. मात्र महामार्ग प्राधिकरणाच्या गलथान कारभारामुळे एका युवकाला हकनाक जीव गमवावा लागला, त्याबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात येत होता. विविध पक्षाचे पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले होते. संदीपच्या अपघाती निधनाचे वृत्त समजताच पावशी गावावर शोककळा पसरली होती.दरम्यान, पावशी आणि कुडाळमधील संतप्त नागरिकांनी घटनास्थळी आंदोलन करुन अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी लावून धरली. कुडाळ पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांची घटनास्थळी धाव.
