You are currently viewing महाविकास आघाडी वीजनिर्मिती करण्यात अपयशी.;भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचा आरोप.

महाविकास आघाडी वीजनिर्मिती करण्यात अपयशी.;भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचा आरोप.

सिंधुदुर्ग/-

राज्यातील महाविकास आघाडी सरकारने सत्तेवर आल्यापासून एकही मेगावॅट वीज निर्मितीसाठी प्रयत्न केले नाहीत. आता खासगी वीज खरेदी करून भ्रष्टाचार करता यावा यासाठी जाणीवपूर्वक भारनियमनाचे संकट निर्माण केले जात असल्याची टीका भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी आज केली.

येथील भाजप कार्यालयात तेली यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, राज्यात महानिर्मितीकडून १० हजार मेगावॅट विजेची निर्मिती क्षमता आहे. मात्र सध्या केवळ ६ हजार मेगावॅट वीज निर्मिती होत आहे. फडणवीस सरकारला जेवढा कोळसा केंद्र शासनाने दिला. त्यापेक्षा अधिक कोसळा महाविकास आघाडी सरकारला केंद्राने दिला आहे. कोळसा विभागाचे २ हजार कोटी रुपये थकीत असतानाही केंद्राकडून कोळसा पुरवला जात आहे. तरीही महाविकास आघाडीतील नेतेमंडळी भारनियमनाचे खापर केंद्र सरकारच्या माथी मारू पाहत आहेत.

तेली म्हणाले, फडणवीस सरकारच्या कालावधीत एकदाही विजेचे दर वाढवावे लागले नाहीत की एकाही शेतकऱ्याची वीज कापावी लागली नाही. पण महाविकास आघाडी सरकारने गेल्या तीन वर्षात तब्बल पंचवीस टक्क्यांनी विजेच्या दरात वाढ केली आहे. याखेरीज वीज बिल थकीत असल्याने हजारो शेतकऱ्यांचा वीज पुरवठा बंद करण्यात आला आहे. वीज पुरवठा बंद केल्याने शेकडो गावांच्या नळयोजनाही बंद झाल्या आहेत.

फडणवीस सरकारच्या काळात ९ हजार मेगावॅट वीजेची निर्मिती होत होती. यात साडे तीन हजार औष्णिक, दीड हजार पवन उर्जा आणि अन्य स्त्रोतांद्वारे १ हजार मेगावॅट विजेची निर्मिती होत होती. आता हीच वीज निर्मिती ६ हजार मेगावॅटवर आली आहे. कोळशाचे नियोजन नसल्याने वीज टंचाईचा सामना करावा लागतो आहे. तसेच देखभाल दुरूस्ती झाल्याने अनेक जनित्रे बंद ठेवावी लागली आहेत. त्यामुळे राज्यात भारनियमनाचे नवे संकट निर्माण झाले आहे. जे फडणवीस सरकारने करून दाखवले ते महाविकास आघाडीला का जमत नाही असा आमचा सवाल असल्याचेही तेली म्हणाले.

अभिप्राय द्या..