बांदा /-

बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी मालवण-हेदुळ लोहारवाडी येथील एकाला राज्य उत्पादन शुल्क यांच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. ही कारवाई काल सायंकाळी इन्सुली राज्य उत्पादन शुल्क तपासणी नाक्यावर करण्यात आली. प्रशांत वामन शेमडकर असे संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून ७३ लाखाच्या दारूसह २२ लाखाचा आयशर टेम्पो असा ९५ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, विभागीय उपआयुक्त, राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर विभाग, कोल्हापूर वाय. एम. पवार यांच्या सूचनेनुसार तसेच अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, सिंधुदुर्ग डॉ. बी. एच. तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, तपासणी नाका इन्सुली, ता. सावंतवाडी यांनी केलेली कारवाईनुसार संशयिताकडून रॉयल ब्ल्यू व्हिस्कीच्या १८० मि.ली. मापाच्या प्रत्येकी ४८ सिलबंद बाटल्या भरलेले एकूण ११०० कागदी पुट्ठयाचे खोके (एकूण ५२,८०० सिलबंद बाटल्या) ७३,९२,००० /- व सदर मद्यसाठा वाहतुकीसाठी वापरलेले सहा चाकी आयशर ट्रक क्र . (MH 07 AJ 2672) २२ लाख रुपये असा एकूण ९५,९२,००० / चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. डॉ. बी. एच. तडवी अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शनानुसार निरीक्षक एस.पी. मोहिते यांनी वरील कारवाई केली. या कारवाईमध्ये परिविक्षाधीन उप अधीक्षक आर. ए. इंगळे, दुय्यम निरीक्षक श्री.पी.एस. रास्कर, सहा दुय्यम निरीक्षक नि . गोपाळ राणे, जवान नि वाहन चालक संदीप कदम तसेच निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क लांजा, जि. रत्नागिरी कार्यालयातील दुय्यम निरीक्षक श्री. एस. व्ही. भागवत, दुय्यम निरीक्षक एन. डी. पाटील, जवान नि. वाहन चालक श्री. एस. बी. विटेकर, जवान श्री . एस. ए. पवार यांच्या पथकाने केली. अधिक तपास निरीक्षक श्री. एस. पी. मोहिते करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page