सिंधुदुर्ग /- समिल जळवी.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात महामार्ग वाहतूक पोलिसांकडून मनमानी कारभार सुरू आहे,खारेपाटण ते बांदा बायपास च्या महामार्गावर वाहनचालकांची आर्थिक लूट सुरू असल्याचे वेळोवेळी दिसून येत आहे.कुडाळ – झाराप , दरम्यान बरेचवेळा महामार्ग पोलिस वाहन चालकांना थांबवून नाहक त्रास देत आहेस. कोरोना नंतर नुकत्याच सुरू झालेल्या पर्यटन आणि व्यापार याना महामार्ग वाहतूक पोलिसांकडून नाहक सुरू असलेल्या दंडुकेशाहीचा विपरीत परिणाम होत असून जिल्हा पोलीस अधीक्षकांनी याकडे गांभीर्याने लक्ष घालून महामार्ग वाहतूक पोलिसांच्या मनमानी कारभाराला वेसण घालण्याची गरज आहे.


सिंधुदुर्ग जिल्ह्यात हायवे चौपदरीकरण झाले, त्यावरून वाहतूकही सुरु झाली आहे. मात्र अद्यापही जिल्ह्यात राष्ट्रीय महमार्गावर स्पीड लिमिट बोर्ड लावलेले नाहीत.त्यामुळे वाहनचालकांना चौपदरी हायवेवर कुठल्या स्पॉटवर नेमका स्पीड किती असावा याची माहिती मिळत नाही. तरीही स्पीड गनच्या आधारे वाहनचालकांवर स्पीड लिमिटचा भंग केल्याबद्दल दंड आकारला जातो आहे. स्पीड गन असलेली हायवे वाहतूक पोलिसांची कार ओसरगाव बोर्डवे फाट्यावर उतारावर उभी असते. उतारावर वाहनांचा स्पीड साहजिकच अधिक असणार हे स्वाभाविक आहे. त्यामुळे उतारावर स्पीड गन लावून दंडात्मक कारवाईसाठी बकरे शोधण्यापेक्षा समपातळीचा रस्ता असेल अशा ठिकाणी स्पीड गन लावावी. ओसरगाव टोल नाक्यावर ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना मुद्दाम थांबवून त्यांची कागदपत्रे तपासणे, पर्यटकांना नाहक त्रास देणे, त्यांची आर्थिक पिळवणूक करणे , प्रसंगी कायद्याची भीती दाखवून पैसे घेऊन पावती न देणे असेही प्रकार या महामार्ग वाहतूक पोलिसांकडून सुरू आहेत. ओसरगाव टोलनाक्यावर गाडी थांबवण्यासाठी अगदी रस्त्याच्या मध्यभागी येऊनही पोलीस थांबतात. अशाने काही अपघात झाला तर त्याला जबाबदार कोण ?


कोरोनानंतर आता पर्यटन हंगामाला सुरुवात झाली आहे. शालेय, तसेच एस एस सी, एच एस सी बोर्ड परिक्षानंतर पर्यटक मोठ्या संख्येने जिल्ह्यात येण्यास सुरुवात होईल.मात्र ओसरगाव येथील टोलनाक्यावर महामार्ग वाहतूक पोलिसांकडून सुरू असलेल्या मनमानी आणि आर्थिक लुटी च्या कारभाराला जिल्हा पोलीस अधीक्षकांनी वेसण घालावी.अन्यथा सिंधुदुर्गातील पर्यटन नको पण महामार्ग वाहतूक पोलिसांना आवरा असेच जिल्ह्यात येणारे पर्यटक म्हणतील त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हॉटेल व पर्यटन व्यवसायावर मोठा परिणाम होऊ शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page