You are currently viewing कुडाळ तालुक्यातील ‘त्या’ शिक्षकांच्या चौकशीसाठी समितीची नेमणूक..

कुडाळ तालुक्यातील ‘त्या’ शिक्षकांच्या चौकशीसाठी समितीची नेमणूक..

कुडाळ /-

तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांनी माहितीच्या अधिकारात प्रशासनाच्या विरोधात माहिती मागितल्याचे तीव्र पडसाद शुक्रवारी येथील पंचायत समितीच्या मासिक सभेत उमटले.शिक्षकांच्या कार्यपद्धतीबाबत खास सभा बोलावण्याची मागणी सदस्यांनी सभापतींकडे केली. या वेळी शिक्षकांविरोधातील मांडलेला ठराव एक विरुद्ध १५ने मंजूर झाला. शिक्षकांच्या चौकशी समितीपदी सहायक गटशिक्षणाधिकारी संदेश किंजवडेकर यांच्या नियुक्तीचा ठराव झाला.

पंचायत समिती मासिक सभा सभापती नूतन आईर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपसभापती जयभारत पालव, गटविकास अधिकारी विजय चव्हाण, सहायक गटविकास अधिकारी मोहन भोई आदी उपस्थित होते. मिलिंद नाईक यांनी सभापती हे शिक्षकांचे ऐकून सर्व करतात, असा आरोप केला. शिक्षकांना सभागृहाची माहिती मागण्याचा अधिकार कोणी दिला? असा सवाल नाईक यांच्यासह माजी सभापती राजन जाधव यांनी केला. जिल्हा परिषद डिगस शाळेला जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत यांनी भेट दिली त्यावेळी शिक्षक गैरहजर होते. अध्यक्षांनी याबाबत पत्र दिले होते. अद्याप त्या शिक्षकांवर कारवाई झाली नाही. याबाबत गटशिक्षणाधिकारी गप्प राहिले. पडतेवाडी शाळेत ५२७ पटसंख्या असताना ११ शिक्षक आहेत. यासाठी तीन शिक्षक ऑर्डर झालेल्या असताना कार्यरत का नाही? असा प्रश्‍न नाईक यांनी उपस्थित केला.

शिक्षकांविरोधातील ठराव असा ज्या शिक्षकांनी माहितीचा अधिकार टाकला आहे, त्यांची पाच वर्षांची माहिती मागवा, ते गावात राहतात का? कामावर जातात का? नोकरी कुठे करतात? याची माहिती द्यावी, अशी मागणी केली. यासाठी ‘त्या’ पाच शिक्षकांना बोलून खास सभा लावा, या मागणीसह शिक्षकांविरोधातील ठराव मांडण्यात आला आणि एक विरुद्ध १५ ने ठराव मंजूर झाला.

अभिप्राय द्या..