सटमटवाडी तपासणी नाका महसूल प्रशासनाच्या आदेशानुसार बंद..

बांदा /-

कोरोना कालावधीत महाराष्ट्र-गोवा सीमेवरील सटमटवाडी येथे उभारण्यात आलेला तपासणी नाका महसूल प्रशासनाच्या आदेशानुसार काल रात्री उशिरपासून बंद करण्यात आला. जिल्ह्यात कोरोनाचे प्रमाण कमी झाल्याने गोव्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात येण्यासाठी आता कोणतीही आडकाठी ठेवण्यात आली नाही.

महाराष्ट्र राज्यात मार्च एप्रिल महिन्यात कोरोनाचे प्रमाण वाढले होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील पॉझिटिव्हीटी रेट वाढल्याने एप्रिल महिन्याच्या अखेरीस महाराष्ट्र-गोवा सीमा बंद करण्यात आली होती. बांदा-सटमटवाडी येथील टोल नाक्यावर तपासणी नाके उभारण्यात आले होते.याठिकाणी पोलीस, आरोग्य व महसूल प्रशासनाचे पथक २४ तास कार्यरत होते. गोव्यातून महाराष्ट्र राज्यात प्रवेश करणाऱ्या वाहनचालकांना ई-पास सक्तीचा करण्यात आला होता. तसेच याठिकाणी प्रवेश करणाऱ्या प्रवाशांची रॅपिड टेस्ट देखील करण्यात येत होती. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून गोव्यात दररोज ये-जा करणाऱ्या नोकरदार तरुणांना याठिकाणी अडविण्यात येत असल्याने अनेकवेळा वादाचे प्रसंग देखील उद्भवत होते.बांदा पोलीस निरीक्षक शामराव काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी काल रात्री उशिरा येथील तपासणी नाके बंद करण्याचे आदेश दिलेत. त्यानुसार सायंकाळी उशिरा आरोग्य व महसूल पथकाला याठिकाणी हटविण्यात आले. सायंकाळी उशिरा याठिकाणी कार्यरत असलेले पोलीस पथक हटवून नाका पूर्णपणे बंद करण्यात आला. नाका बंद करण्यात आल्यानंतर मुंबई-गोवा महामार्गावरील एकदिशा मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्यात आली. टोलनाका येथील रस्ता अडथळा टाकून बंद करण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्यातून गोव्यात ये-जा करण्यासाठी आता कोणतीही आडकाठी ठेवण्यात आली नाही, मात्र गोवा राज्यात प्रवेश करताना पत्रादेवी (गोवा) येथील पोलीस तपासणी नाक्यावर अद्यापही अडवणूक करण्यात येत आहे. वाहनचालकांकडे कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र किंवा दोन डोस घेतल्याचे प्रमाणपत्र तपासूनच गोव्यात प्रवेश देण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

You cannot copy content of this page