सावंतवाडी /-

कोकण रेल्वे प्रवाशांच्या विविध मागण्यांबाबत रेल्वे प्रशासनाला जाग येण्यासाठी १५ ऑगस्टला मळगाव रेल्वेस्टेशन समोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने अध्यक्ष डी. के. सावंत यांनी दिला आहे. गेली अनेक वर्षे वारंवार मागण्या करून सुद्धा अनेक ठिकाणी थांबे मिळत नाहीत. अगदी गर्दी करून कोकणातून मुंबईत जाणाऱ्या प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे याबाबत योग्य तो निर्णय घेण्यात यावा, यासाठी हे आंदोलन छेडण्यात येणार आहे. याबाबतचे निवेदन प्रसिद्धीस देण्यात आले आहे.

त्यात असे नमूद करण्यात आले आहे की, कोकण रेल्वे सावंतवाडी पर्यंत आल्यावर जवळजवळ पंचवीस वर्षे झाली. परंतु लाखो कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशी, आपल्या रास्त मागण्या मान्य करुन घेण्यासाठी गेली अनेक वर्षे अर्ज विनंत्या, उपोषणे आदी सनदशीर मार्गाने आंदोलने करुनही प्रशासनाकडून हेतुपुरस्सर दुर्लक्ष करण्यात येत आहे. मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, पुणे परिसरात सुमारे दहा लाख कोकण कुटुंबे, आपल्या उदरनिर्वाहासाठी, पिढ्यानपिढ्या स्थायिक असून, सणावाराला, कौटुंबिक बऱ्या-वाईट प्रसंगी, जत्रा महोत्सव, धार्मिक विधीसाठी आपल्या मायभूमीत वारंवार फेऱ्या मारतात. तसेच कोकण हे पर्यटन दृष्ट्या महत्वाचे असून सिंधुदुर्ग जिल्हा हा देशातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून ओळखला जातो. अशा या निसर्गरम्य व आरोग्य दृष्ट्या अत्यंत महत्वाच्या कोकणात मोठ्या प्रमाणात येऊ इच्छिणाऱ्या देश परदेशातील पर्यटकांची फारच गैरसोय होत आहे. कारवार – मडगांव पॅसेंजर गाड्यांचा सावंतवाडी / कुडाळ पर्यंत विस्तार करावा. यासह अनेक मागण्यांसाठी १५ ऑगस्ट रोजी सावंतवाडी रेल्वे स्थानक येथे कोरोनाचे नियम पाळत एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात येणार असल्याचे त्यांनी निवेदनाद्वारे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page