सावंतवाडी /-
दडी मारलेल्या पावसाने गेल्या दोन दिवसांत जोरदार आगमन करत सर्वत्र पाणीच पाणी केले. मडुरा माऊली मंदिर जवळ असलेले पूल पाण्याखाली गेल्याने मडुरा-सातोसे-सातार्डा मार्ग ठप्प झाला होता. पुलावर सुमारे चार फूट पाणी आल्यामुळे रुग्णवाहिकेसह शेकडो वाहने अडकली होती. वारंवार मागणी करुनही याकडे दुर्लक्ष होत असल्याने अखेर २६ जुलै रोजी याच पुलावर उपोषण छेडणार असल्याचा इशारा, श्री देवी माऊली दशक्रोशी रस्ता संघर्ष समितीने दिला आहे. मडुरा पंचक्रोशीत गेले दोन दिवस मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला. मडुरा माऊली मंदिर जवळील पूल सुमारे चार ते पाच तास पाण्याखाली गेल्यामुळे पुलाच्या दुतर्फा शेकडो वाहने अडकून पडली होती. पुलाची उंची वाढविण्यासंदर्भात वारंवार मागणी करुनही केवळ राजकीय अनास्थेपोटी पुलाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप उपस्थित ग्रामस्थांनी केला. लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांचे याकडे लक्ष वेधूनही दुर्लक्ष होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मडुरा-सातोसे-सातार्डा मार्ग थेट गोव्याला जोडला गेला असल्याने येथून रात्रंदिवस वाहतूक सुरू असते. अशा पूरस्थितीत नोकरीसाठी ये-जा करणाऱ्या युवकांना भर पावसात रस्त्यावरच थांबावे लागत आहे. तसेच प्रशासनाने याकडे अद्यापही लक्ष न दिल्यामुळे नाइलाजास्तव आम्हाला २६ जुलै रोजी उपोषणाचा मार्ग पत्करावा लागत असल्याचे श्रीदेवी माऊली दशक्रोशी रस्ता संघर्ष समितीचे बाळू गावडे यांनी सांगितले.