हिंदूंचे अस्तित्व टिकवायचे असेल, तर हिंदूंनी संघटित होणे, हाच एकमेव पर्याय !.; – श्री. कपिल मिश्रा, भाजप नेते तथा माजी आमदार, देहली

सिंधुदुर्ग /-

सद्यस्थितीत हिंदु संस्कृती, सभ्यता, परंपरा, इतिहास, शौर्य याला अपमानित आणि समाप्त करण्यासाठी देशात प्रतिदिन नवीन षड्यंत्रे रचली जात आहेत. देशातील विविध राजकीय पक्ष, विविध क्षेत्रांतील लोक आणि बुद्धीजीवी वर्ग हिंदूंच्या सण-उत्सवांची थट्टा करून, तसेच हिंदु धर्माला अपमानित करून हिंदूंमध्ये न्यूनगंड निर्माण करत आहेत. हिंदूंना धर्म विसरण्यास भाग पाडले जात आहेत. देशातील हिंदु मंदिरांवर हल्ले केले जात आहेत. राममंदिरासाठी निधी गोळा करणार्‍या रिंकू शर्मा या युवकाची देशाच्या राजधानीत चाकू भोसकून हत्या केली जाते. या परिस्थितीत हिंदूंकडे ‘हिंदुसंघटन’ हाच एकमेव पर्याय उरला आहे. असे न झाल्यास हिंदूंची ओळख पुसली जाईल. त्यामुळे आपापसांतील भेदभाव विसरून आपले अस्तित्त्व टिकवण्यासाठी संकल्पशक्ती, उर्जा आणि उत्साह यांनी भारलेल्या हिंदु बांधवांनी आता संघटित व्हायलाच हवे, असे आवाहन देहली येथील भाजप नेते तथा माजी आमदार श्री. कपिल मिश्रा यांनी केले. ते हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘ऑनलाईन हिंदु राष्ट्र-जागृती सभे’त बोलत होते.

सभेच्या आरंभी शंखनाद झाल्यावर हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक पू. नीलेश सिंगबाळ यांनी दीपप्रज्ज्वलन केले. सनातन संस्थेचे धर्मप्रचारक श्री. आनंद जाखोटिया यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. या ‘ऑनलाइन’ सभेचा ‘यू-ट्यूब’ आणि ‘फेसबुक’ यांच्या माध्यमांतून 48,000 लोकांनी लाभ घेतला.

या वेळी हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक पू. नीलेश सिंगबाळ म्हणाले की, भारतात ‘लव्ह जिहाद’, ‘लॅण्ड जिहाद’ आदी माध्यमांतून ‘जिहाद’ चालू आहेत. त्यांत इस्लामी नियमांनुसार चालू झालेल्या ‘हलाल’ अर्थव्यवस्थेने भारताच्या अर्थव्यवस्थेला आव्हान दिले आहे. ‘हलाल’ नावाच्या ‘फूड जिहाद’ला जागरूक भारतियांनी बळी न पडता त्यावर बहिष्कार घातला पाहिजे. ‘धर्मनिरपेक्षते’च्या नावाखाली चर्च आणि मशिदी यांना हातही न लावणार्‍या राज्य सरकारांनी केवळ हिंदूंची मोठी मंदिरे आपल्यात नियंत्रणात घेतली आहेत. सिनेमा, वेब सिरीज आदींच्या माध्यमांतून हिंदु धर्माचा अपमान केला जात आहे. हे रोखण्यासाठी भारतात ‘ईशनिंदाविरोधी कायदा’ लागू केला पाहिजे.

या वेळी सनातन संस्थेचे धर्मप्रचारक श्री. आनंद जाखोटिया म्हणाले की, कोरोना महामारीतून अजूनही संपूर्ण विश्‍व सावरलेले नाही. पुढे येणार्‍या कठीण काळात आत्मबळाची आवश्यकता आहे आणि हे बळ साधनेनेच निर्माण होईल. छत्रपती शिवाजी महाराज, महाराज प्रताप यांसारख्या शूर योद्ध्यांनीही नामस्मरण करत ईश्‍वराकडून सामर्थ्य प्राप्त केले होते. याप्रमाणेच आपणही साधना करून लोककल्याणकारी हिंदु राष्ट्र-स्थापनेची पताका फडकावली पाहिजे.

या सभेत धर्मवीरांनी दाखवलेली स्वसंरक्षणाची प्रात्यक्षिके, तसेच बालसाधकांनी लघुपटातून राष्ट्ररक्षण आणि धर्मचरणाचे केलेले आवाहन लक्ष्यवेधी ठरले. या वेळी राष्ट्ररक्षण आणि धर्मशिक्षणविषयक फ्लेक्स प्रदर्शनही दाखवण्यात आले. सभेच्या शेवटी हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी, तसेच हिंदूंच्या विविध मागण्यांसाठी ठराव पारित करण्यात आले. संपूर्ण ‘वंदे मातरम्’ने या सभेची सांगता झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

You cannot copy content of this page