कुडाळ /-
कुडाळ नगरपंचायतीने प्रसिद्ध केलेल्या अस्तित्वातील जमीन वापर विभाग नकाशावर हरकती आल्यानंतर नगरपंचायतीच्या नगरसेवकांची बैठक यासंदर्भात झाली आणि या बैठकीत ज्या नागरिकांच्या हरकती आहे त्यांच्या हरकती काय आहे हे प्रत्यक्ष ऐकून घेण्यासाठी सुनावणीचे आयोजन करण्याचे ठरविण्यात आले आहे ही सुनावणी मंगळवार १५ नोव्हेंबर रोजी महालक्ष्मी हॉल येथे घेण्याचे ठरले आहे.
कुडाळ नगरपंचायतीने अस्तित्वातील जमीन वापर विभाग नकाशा तयार करण्यासाठी नगर रचनाकार यांच्या माध्यमातून कंपनी नेमली होती या कंपनीने अस्तित्वातील जमीन वापर नकाशा तयार केला हा नकाशा प्रसिद्ध केल्यानंतर शहरातील ५३७ नागरिकांनी हरकती नोंदवल्या होत्या. या हरकतींबाबत कोणत्या प्रकारे निर्णय घेतला जावा तसेच या नकाशा बाबतची माहिती नगरसेवकांना व्हावी यासाठी नकाशा तयार करणारी कंपनी आणि नगरसेवकांची बैठक सोमवार ७ नोव्हेंबर रोजी नगरपंचायत कार्यालय येथे पार पडली यावेळी नगराध्यक्ष आफरीन करोल, नगरसेविका सौ. संध्या तेरसे, भाजप गटनेते विलास कुडाळकर, नगरसेविका श्रेया गवंडे, ज्योती दळवी, श्रुती वर्दम, अक्षता खटावकर, नगरसेवक निलेश परब, राजीव कुडाळकर, उदय मांजरेकर, गणेश भोगटे, संतोष शिरसाट उपस्थित होते.
या बैठकीमध्ये कंपनीच्या अधिकाऱ्यांना अस्तित्वातील वापर नकाशा या संदर्भात प्रश्न उत्तर करण्यात आले या अधिकाऱ्यांनी सांगितले की हा नकाशा अंतिम नाही याबाबत सुनावणी होणार आहे जशा सूचना येतील तशा दुरुस्ती केल्या जातील असे सांगितले त्यानंतर नगरसेवकांनी सांगितले की, याबाबत ज्या नागरिकांच्या हरकती आहेत त्या नागरिकांसमवेत सुनावणी घ्या आणि त्यानुसार दुरुस्त्या करा कोणत्याही नागरिकांवर अन्याय होऊ नये याची दक्षता घ्या त्यानंतर या सुनावणीसाठी १५ नोव्हेंबरची तारीख देऊन महालक्ष्मी हॉल निश्चित करण्यात आला.
