वेंगुर्ला /-

वेंगुर्ले तालुक्यातील मठ श्री देव स्वयंभू मंदिर नजीकच्या  पुलाच्या कठड्यासह रस्त्याचा अर्धा भाग सोमवारी चार जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे कोसळला असून येथे धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे.येथील जनतेच्या हिताच्या दृष्टीने संबंधित विभागाने त्वरित लक्ष पुरवून ग्रामस्थांची गैरसोय होऊ नये, यादृष्टीने त्वरित उपाययोजना करावी,अशी मागणी मठ सरपंच तुळशीदास उर्फ दादा ठाकूर व ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आली आहे.येथून केवळ दुचाकी वाहतूक सुरु असून पावसामुळे नजीकच्या भागाची झीज होऊन कोणत्याही क्षणी उर्वरित भाग कोसळू शकतो व येथील वाड्यांचा संपर्क तुटू शकतो. मठ गावातून श्री देव स्वयंभू मंदिर, श्री देवी सातेरी मंदिर, परबवाडा, सिध्दार्थनगर आदी भागात जाणारा हा महत्वाचा मार्ग आहे.भाविक, शालेय विद्यार्थी, दैनंदिन कामकाज, खरेदीसाठी जाणाऱ्या लोकांची मोठी गैरसोय होऊ शकते.येथून केवळ दुचाकीच जात असल्याने मुख्यतः अत्यावश्यक वैद्यकीय सुविधांसाठी जाण्यासाठी अन्य मार्ग उपलब्ध नसल्याने गंभीर समस्या उद्भवू शकते. तसेच शेती हंगाम सुरु असून यामुळे शेतकरी वर्गाचीही मोठी गैरसोय होऊ शकते.कारण जोरदार पाऊस बरसत असून आणखीन भाग कोसळल्यास येथील वाड्यांचा संपर्क तुटू नये व ग्रामस्थांची गैरसोय होऊ नये यादृष्टीने संबंधित विभागाने त्वरित लक्ष पुरवून उपाययोजना करावी, अशी मागणी सरपंच तुळशीदास ठाकूर यांनी केली आहे.येथील एक कठडा कोसळला असून उर्वरित तीन कठडेही धोकादायक बनले असून याबाबत वेळीच लक्ष न पुरविल्यास मुख्य पुलालाही धोका उदभवू शकतो,असेही ठाकूर यांनी सांगितले.दरम्यान  सोमवारी सायंकाळी बांधकाम विभागाचे चव्हाण यांनी संबंधित पुलाची पाहणी करुन वरिष्ठांना कळविण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे. परंतु सद्यस्थिती पाहता, त्वरित उपाययोजना होणे अत्यावश्यक असून त्वरित कार्यवाही व्हावी,अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page