१५ ऑक्सिजन बेड उपलब्ध; दोन एमबीबीएस डॉक्टरांची नियुक्ती
कुडाळ /-
आमदार वैभव नाईक यांची माहिती कुडाळ महिला बाल रुग्णालयात उद्यापासून डीसीएचसी सेंटर सुरु करण्यात येणार असून याठिकाणी १५ ऑक्सिजन बेड उपलब्ध करण्यात आले आहेत.तसेच १० जंबो ऑक्सिजन सिलेंडर देण्यात आले आहेत. रुग्णांवर उपचार करण्यासाठी दोन एमबीबीएस डॉक्टर किरण मुळे, व डॉ.विद्याधर हनुमंते यांची नेमणूक करण्यात आली आहे. अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोविड रुग्णांची संख्या वाढत असून ऑक्सीजन बेडची आवश्यकता भासत आहे. पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, आ. वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतुन कुडाळ महिला बाल रुग्णालयात यापूर्वीच सीसीसी सेंटर सुरु करण्यात आले असून याठिकाणी कुडाळचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.प्रमोद वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली कोविड रुग्णांवर उपचार केले जात आहेत. याठिकाणी ऑक्सिजन बेड देखील सुरु करण्याची मागणी आ. वैभव नाईक यांनी ना. उदय सामंत, खा. विनायक राऊत, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्याकडे केली होती. त्यानुसार कुडाळ महिला बाल रुग्णालयात उद्यापासून डीसीएचसी सेंटर सुरु करण्यात येणार असून १५ ऑक्सिजन बेडची व्यवस्था करण्यात आल्याने कोविड रुग्णांना याचा लाभ होणार आहे.