मालवण /-
शहर निर्जंतुकीकरण करण्याच्या दृष्टीने शहरात उद्यापासून औषध फवारणी मोहीम सुरू करण्यात येणार आहे. किनारपट्टी भागातील विहिरींच्या पाण्याची कमी झालेली पाण्याची पातळी लक्षात घेता साथरोग समस्या निर्माण होऊ नये या दृष्टीने विहिरींमध्येही औषध टाकण्याची मोहीम राबविली जाणार आहे. अशी माहिती नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी दिली.
शहराच्या आरोग्याच्या दृष्टीने आढावा घेण्यासाठी नगराध्यक्ष दालनात आज दुपारी बैठक पार पडली. यावेळी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, मुख्याधिकारी संतोष जिरगे, नगरसेवक पंकज सादये, नगरसेवक यतीन खोत, कार्यालय निरीक्षक जयसिंग गावित, आरोग्य लिपिक महेश परब, स्वच्छता विभाग मुकादम आनंद वळंजू आदी उपस्थित होते.
शहर परिसरात एकीकडे कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. उन्हाळी हंगाम लक्षात घेता पाण्याची पातळी कमी झाल्याने साथरोगही पसरण्याची शक्यता आहे. या सर्व दृष्टिकोनातून खबरदारीच्या उपाययोजना म्हणून प्रशासनास उपाययोजना बाबत आदेश देण्यात आले आहेत. शहरात कचरा साचणार नाही, आरोग्याची समस्या निर्माण होणार नाही यादृष्टीने उपाययोजना व नियोजन करण्याबाबत सूचना करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.