वेंगुर्ला /-
वेंगुर्ले पं. स.सभापती अनुश्री कांबळी यांचा राजीनामा ६ जानेवारी २०२१ रोजी जिल्हा परिषद अध्यक्ष समिधा नाईक यांच्याकडे देण्यात आला.मात्र जि. प.अध्यक्ष समिधा नाईक यांनी आपल्या पदाचा गैरवापर करीत सभापती पदाचा राजीनामा फेटाळला व या सभागृहाचा अवमान केला आहे,असा आरोप करीत पं. स.सदस्य यशवंत उर्फ बाळू परब यांनी निषेध व्यक्त केला.तसेच सुनिल मोरजकर यांनीही या विषयावर आक्रमक भूमिका घेतली.दरम्यान सभापती अनुश्री कांबळी यांनी हा विषय जि. प.अध्यक्ष यांच्या अखत्यारीत असल्याचे सांगून या विषयावर भाष्य करण्याचे टाळले.
वेंगुर्ले पंचायत समितीची मासिक सभा आज शुक्रवारी सभापती अनुश्री कांबळी यांच्या अध्यक्षतेखाली बॅ. नाथ पै सभागृहात संपन्न झाली.यावेळी उपसभापती सिद्धेश उर्फ भाई परब,प्रभारी गटविकास अधिकारी विद्याधर सुतार,पं. स.सदस्य यशवंत परब,सुनिल मोरजकर,मंगेश कामत,शामसुंदर पेडणेकर, प्रणाली बंगे,गौरवी मडवळ,स्मिता दामले आदींसह विविध खात्याचे पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान गेली सात वर्षे आसोली सडा भागात शेतकऱ्यांच्या आंबा- काजू बागायतीचे शॉर्टसर्किटमुळे नुकसान होत आहे.शेतकऱ्यांनी किती वर्षे नुकसान सहन करावे,असा प्रश्न सुनिल मोरजकर यांनी उपस्थित करून याबाबत संबंधित कार्यक्षेत्रात ३३ केव्ही ची लाईन अंडरग्राऊंड व्हावी ,तसेच शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने ठोस उपाययोजना व्हावी,अशी मागणी सुनिल मोरजकर यांनी केली.याबाबत इलेक्ट्रिक विभागाचे अधिकारी यासाठी जास्त खर्च येत असल्याने
बागायदारांचे नुकसान होऊ नये,यासाठी तांत्रिक कामे करण्यात येत असल्याचे सांगितले. याबाबत सभापती अनुश्री कांबळी यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे आदेश संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.दरम्यान जिल्हा नियोजन आराखड्यातून “जिल्ह्यासाठी १७० कोटी मंजूर मंजूर झाल्याबद्दल पालकमंत्री उदय सामंत यांच्या अभिनंदनाचा ठराव सभापती अनुश्री कांबळी यांनी मांडला.”
सध्या आंबा – काजूस आग लागून शेतकऱ्यांना नुकसानीस सामोरे जावे लागत आहे.महाराष्ट्र शासनाची फळपिक विमा योजनेत आकस्मिक लागणाऱ्या अशा आगीच्या नुकसानीचा समावेश करून शेतकऱ्यांना लाभ मिळावा,असा ठराव यशवंत परब यांनी मांडला.तसेच मोचेमाड येथे खचलेल्या रस्त्याच्या ठिकाणी रिटेनिंग वोल बांधण्यात यावी,अशी मागणी परब यांनी केली.तसेच सिद्धेश परब,गौरवी मडवळ,मंगेश कामत,स्मिता दामले,प्रणाली बंगे आदींनीही यांनीही विविध विषयांवर सूचना मांडल्या.सभापती अनुश्री कांबळी यांनी विविध विविध विकास कामासंदर्भात संबंधित विभागाच्या पदाधिकारी यांना कार्यवाही करण्याचे आदेश दिले.