मसुरे |-
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंतरजिल्हा बदली बाबत निर्माण झालेले विविध प्रश्न लवकरच मंत्रालयात खास सभा घेऊन सोडविणार असल्याची ग्वाही ग्रामविकास मंत्री हसन मुश्रिर1 समितीच्या पदाधिकारी यांना दिली.यावेळी आमदार वैभव नाईक यांनी हा प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या प्रतिनिधींनी राज्याध्यक्ष उदयराव शिंदे यांचे नेतृत्त्वात ग्राम विकास विभागाचे मंत्री- हसनजी मुश्रीफ यांची आज मंगळवारी (ता. २ फेब्रुवारी) मंत्रालयीन दालनात भेट घेतली. तसेच बदली धोरण समितीच्या सदस्यांचीही भेट घेतली.
जिल्हांतर्गत बदली करताना एकल किंवा सेवाकनिष्ठांवर अन्याय होऊ नये यासाठी सर्वसमावेशक असे बदली धोरण असावे. बदली प्रक्रिया ऑनलाईन असावी; मात्र संपूर्ण कार्यान्वयन मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे नियंत्रणात असावे. सरसकट दरवर्षी बदल्यांमुळे अस्थिरता निर्माण होईल; त्यासाठी टक्केवारी असावी.
२०१८, २०१९ च्या बदलीत विस्थापित आणि रँडम राऊंड मधील व पती-पत्नी विभक्तीकरण झालेल्या शिक्षकांना सेवा कालावधी क्षमापित करून बदलीमध्ये प्राधान्य द्यावे. स्वतः माजी सैनिक असणाऱ्या तसेच जन्मापासून एकच मूत्रपिंड असणाऱ्या शिक्षकांना विशेष संवर्ग-१ मध्ये समाविष्ट करावे. बदलीसाठी संदर्भित दिनांक ३० जून असावा. बदली प्रक्रिया टप्पानिहाय असावी ज्यायोगे रिक्त जागा लक्षात येतील. एकदा विनंती बदली झाल्यास पुन्हा किमान तीन वर्षे विनंती बदलीची संधी देऊ नये. बदल्यांमध्ये महिलांना प्राधान्य देण्यात यावे. आंतरजिल्हा बदलीने नियुक्त शिक्षकांची मूळ जिल्ह्यातील सेवा सर्व प्रकारच्या प्रयोजनासाठी ग्राह्य धरावी. पती-पत्नी दोघेही जिल्हा परिषदेचे शिक्षक असल्यास दोघांपैकी कुणासही अर्ज करण्याची संधी असावी. अशाप्रकारच्या व अन्य शिक्षक हितैषी आणि सर्वसमावेशक असे निवेदन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने ग्रामविकास मंत्री तसेच बदली धोरण समितीकडे सादर केले.
आंतरजिल्हा बदल्यांसाठी १०% रिक्त जागेची अन्यायपूर्ण अट वगळावी. टप्पा क्रमांक- १,२,३ आणि ४ मध्ये बदली झालेल्यांना कार्यमुक्त करावे.तसेच टप्पा क्र.५ मध्ये सिंधुदुर्गसह कोकण विभागाचा प्रामुख्याने समावेश करावा. ज्या जिल्ह्यात बदली झाली तेथे विनाअट रुजू करून घ्यावे. बदलीसाठी शून्य बिंदुनामावली असावी. कोकण विभागातील आंतरजिल्हा बदल्यांची अडचण लक्षात घेऊन याबाबत स्वतंत्र धोरणात्मक विचार करावा.
कोकण विभागात निर्माण झालेल्या आंतरजिल्हा बदलीच्या प्रश्नावर स्वतंत्र बैठक घेण्याबाबत ग्रामविकास मंत्री यांनी मान्य केले.
यावेळी आमदार वैभव नाईक, शिक्षक समितीचे राज्य उपाध्यक्ष राजन कोरगावकर, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष नितीन कदम, सरचिटणीस सचिन मदने, जिल्हा, कुडाळ शिक्षक नेते शशांक आटक, मालवण कार्याध्यक्ष रुपेश गरुड यांचेसह राजेश राठोड,चंद्रकांत कदम,संजय चव्हाण,संतोष जाधव,बाळासाहेब केंद्रे,माधव थोटे,संतोष दासरवाड,मंगेश काळे,दादासाहेब ठोंबरे,ज्ञानेश्वर परदेशी आदी आंतरजिल्हा बदली शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.