मालवण /-
मालवण शहरात किनारपट्टीवर जो बंधारा कम रस्ता (रिंगरोड) उभारणी करण्यात आला आहे. तसेच प्रस्तावित बंधाऱ्यांची नोंद जशी शहर विकास आराखड्यात आहे. तशीच नोंद सीआरझेड नकाशात व्हावी. तसेच ३०० स्केअर मीटर पर्यत घर बांधणी परवानगी अधिकार पालिका स्तरावर देण्यात आले आहेत. तेच अधिकार ३०० स्केअर मीटर पर्यत वाणिज्य वापरासाठीही पालिका स्तरावर मिळावेत. अशी आग्रही मागणी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी सीआरझेड ऑनलाईन सुनावणीत केली आहे.
दरम्यान, सीआरझेडबाबत लेखी स्वरूपात १११ हरकती यापूर्वीच नगरपालिकेच्या वतीने आपण जिल्हा प्रशासनाकडे सादर केल्या आहेत. पालिकेच्या विशेष बैठकीतील ठरावानुसारही आपण हरकती नोंदवल्या आहेत. या सर्वाचाही विचार व्हावा. अशी भूमिकाही नगराध्यक्ष कांदळगावकर यांनी मांडली. तर मरिन सेंच्युरी व कोळीवाडे याबाबत खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, दीपक केसरकर यांनी मालवण शहराच्या हिताच्या दृष्टीने ज्या भूमिका मांडल्या. त्यांचेही नगराध्यक्ष यांनी आभार मानले.
सीआरझेड नकाशा निश्चितीसाठी जिल्हा प्रशासनाकडून गेले तीन दिवस जनसुनावणी घेण्यात आली. लोकप्रतिनिधी व हरकतदारांसाठी प्रथम ऑनलाईन व नंतर ऑफलाईन घेण्यात आलेल्या जनसुनावणीला नागरिकांनी तीव्र विरोध दर्शविल्यानंतर आज जिल्हा प्रशासनाकडून लोकप्रतिनिधींसाठी ऑनलाईन सुनावणी घेण्यात आली. यात पालकमंत्री, खासदार, आमदार यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी सहभाग घेत सीआरझेड विषयी चर्चा केली. यामध्ये मालवण पंचायत समिती मध्ये सुनावणी कक्षात लोकप्रतिनिधींसह तारकर्ली पर्यटन विकास संस्थेच्या सभासदांही निमंत्रित करण्यात आले. यावेळी सभापती अजिंक्य पाताडे तहसीलदार अजय पाटणे, गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर, सहाय्यक गटविकास अधिकारी श्याम चव्हाण, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, नगरपालिका मुख्याधिकारी जयंत जावडेकर, जि. प. सदस्य हरी खोबरेकर, पं. स. सदस्या मधुरा चोपडेकर, तारकर्ली पर्यटन विकास संस्थेचे अध्यक्ष विष्णू मोंडकर, रवींद्र खानविलकर, छोटू सावजी, दिलीप घारे, महेंद्र पराडकर, तारकर्ली सरपंच सौ. स्नेहा केरकर, डॉ. जितेंद्र केरकर आदी व इतर अधिकारी, पर्यटन व्यावसायिक उपस्थित होते.
नकाशा तयार करताना मालवणसह जिल्ह्याच्या किनारपट्टीवर असणारी जैवविविधता व दुर्ग किल्ले यांचा विचार केलेला नाही. येथील विविधता असणारी व बदलत राहणारी भौगोलिक परिस्थितीचा व लोकांच्या राहणीमानाचा कोणताही प्रत्यक्ष अभ्यास न करता केवळ गुगल मॅप द्वारे सीआरझेडचा आराखडा बनविला गेला. त्यामुळे हा आराखडाच चुकीच्या पद्धतीने बनविला गेला असून हा स्थानिक नागरिक, मच्छीमार, पर्यटन व्यावसायिक यांच्यासाठी अन्यायकारक आहे. स्थानिक परिस्थितीचा अभ्यास न करता बनविलेला हा आराखडा लागू झाल्यास लोकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागेल, अशी भूमिका तारकर्ली पर्यटन विकास संस्थेचे अध्यक्ष विष्णू मोंडकर यांनी मांडली.
६५ पैकी ४८ गावे बाधित
मालवण तालुक्यातील ६५ पैकी ४८ गावे ही सीआरझेड मध्ये बाधित होत आहे. यात जी गावे समुद्र व खाडी पासून लांब आहेत त्यांचाही सीआरझेड मध्ये समावेश आहे. याबाबत मार्गदर्शन व्हावे व त्यासाठी कार्यशाळा घेण्यात यावी अशी मागणी यावेळी सभापती अजिंक्य पाताडे यांनी केली. यावेळी अन्य उपस्थितांही भूमिका मांडल्या.