✍🏼लोकसंवाद /- कुडाळ.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही किल्ले आज काळाच्या उदरात नष्ट झाले असून काही किल्ल्यांचे अवशेष मात्र नावापुरते नाहीतर इतिहासाच्या पानातच उरले आहे. आकेरी किल्ला/भुईकोट याचेच एक उदाहरण म्हणजे कुडाळ तालुक्यात असलेला आकेरी किल्ला/भुईकोट आज केवळ अवशेष रुपात शिल्लक आहे.

आकेरी किल्ला/भुईकोट सावंतवाडी शहरापासुन ७ कि.मी. अंतरावर तर कुडाळपासून १५ कि.मी. अंतरावर आहे. आकेरी किल्ल्याबद्दल परिसरातील लोकांना माहिती नाही असे म्हणायला काहीच हरकत नाही.

कधीकाळी रामेश्वर मंदिराच्या उजव्या बाजुला उभा असणारा आकेरीचा किल्ला आज पार भुईसपाट झाला आहे. आता आपल्याला मंदिराच्या उजव्या बाजुस काही अंतरावर किल्ल्याची साधारण ५ फुट उंचीची व १०० ते १५० फुट लांबीची उध्वस्त तटबंदी व या तटबंदीतील २ बुरुज पहायला मिळतात. तटबंदीचा आतील भाग ढिगाऱ्यात रुपांतर झाला असुन बाहेरील बाजुने हे बांधकाम व बुरुज दिसुन येतात. तटबंदीच्या बाहेरील बाजुस असलेला खंदक माती भरून बुजलेला आहे.. किल्ल्याचे इतर कोणतेही अवशेष आता शिल्लक नाहीत.

आकेरी किल्ल्याची बांधणी केव्हा व कोणी केली हे ज्ञात नसले तरी १८ व्या शतकात हा किल्ला सावंतवाडीच्या अमलाखाली होता. इ.स. १७८७ मध्ये करवीरच्या सैन्याने नांदोस येथे सावंतांचा पराभव करून सावंतवाडीच्या दिशेने चाल केली. या सैन्याची आकेरी येथे सावंतांच्या फौजेबरोबर गाठ पडली असता करवीरच्या सैन्याला माघार घ्यावी लागली. इ.स. १७८८ मध्ये सावंतांच्या मदतीस आलेल्या पोर्तुगीज सैन्याचा तळ आकेरी येथे होता. या सैन्याच्या फिल्ड मार्शलने गोव्यास लिहिलेल्या पत्रानुसार येथे खाद्य पदार्थांचा तुटवडा असुन सावंत पोर्तुगीज सैन्यास हवी तशी मदत वेळेवर करत नसल्याचे कळवले आहे. याशिवाय तो सावंतानी आकेरी येथे सैन्य ठेवल्याचे देखील कळवतो.

सावंत घराण्यातील इ.स. १८०६ मधील वारसाहक्काच्या कलहात फोंड सावंत यांनी अकेरीस पळ काढत करवीरकरांकडे व पेशव्यांकडे सहाय्य मागीतले. यावेळी करवीरकराचे रांगण्याचे किल्लेदार राणोजी निंबाळकर व पेशव्यांचे साळशी येथील अंमलदार चिटकोपंत अकेरी येथे एकत्र आले असता राणोजीनी चिटकोपंत यांना पकडुन सिंधुदुर्ग किल्ल्यात कैदेत ठेवले. या काळात कदाचित अकेरी करवीरकराच्या ताब्यात आला असावा पण नंतरच्या काळात मात्र तो सावंतांच्या अमलाखालीच दिसतो. असा या किल्ल्याचा उपलब्ध इतिहास आहे.

या किल्ल्याच्या संवर्धनासाठी दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभागामार्फत मोहीम आयोजित केली असून इच्छुक दुर्गप्रेमींनी आपली नावे खालील व्हाट्सअप्प क्रमांकावर नोंदवावीत ही विनंती. (टीप : सुरुवातीला नोंदणी केलेल्या पाच इच्छुकांनाच मोहिमेत सहभागी करून घेता येईल) ९८६०२५२८२५/ ९४२२२६३८०२ दिनांक : २६ फेब्रुवारी २०२३ वेळ : सकाळी ८.०० वाजता दुर्ग मावळा परिवार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page