महाविकास आघाडीतील सर्वसामान्य कार्यकर्त्यावर अन्याय झाल्यास घटक पक्ष म्हणून तिन्ही पक्ष त्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी.;तिन्ही पाक्षातील प्रमुख नेत्याचे स्पष्टीकरण.
लोकसंवाद /- कुडाळ.
राज्यात घटनेची पायमल्ली करून आलेल्या सरकारमुळे आता सर्वसामान्य मंडळींना सुद्धा त्रास होत आहे, परिणामी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना राज्यात एकत्र आहे.त्यामुळे आता ती एकसंघपणा सिंधुदुर्ग जिल्ह्यातही त्याच पद्धतीने संघटित राहणार आहे.लोकशाहीच्या संवर्धनासाठी आणि भाजप व मोदी-शहाच्या हुकुमशाही धोरणाविरुद्ध लढण्यासाठी सर्वांनी एकत्र राहिले पाहिजे. त्यासाठी जिल्ह्यातील या पुढील सर्व निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच लढण्याचा निर्धार महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केला.
कुडाळ राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत शिवसेनेचे उपनेते गौरीशंकर खोत,राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते,काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख,माजी जिल्हा बॅक अध्यक्ष सतिश सावंत,काका कुडाळकर,बाळ कनयाळकर,प्रकाश जैतापकर, शिवाजी घोगळे,प्रफुल्ल सुद्रिक, प्रांतिक सदस्य निलेश गोवेकर,शेखर जोशी आदी उपस्थित होते.
यावेळी गौरीशंकर खोत म्हणाले की, देशातील राजकारणाची दिशा भारतीय जनता पार्टीने बदलून टाकली आहे. सरकारी यंत्रणांचा वापर करून विरोधी पक्षातील नेत्यांना टार्गेट करणे,सत्ताधाऱ्याकडून विरोधी पक्षातील नेत्यांवर खोट्या केसेस दाखल करण्याचे काम सुरू केले आहे. एकूणच अघोषित आणीबाणी भाजपने सुरू केली आहे,हा धोका ओळखून अडीच वर्षापूर्वी महाविकास आघाडीचे सरकार राज्यात आले. त्यावेळी महाविकास आघाडी सरकारने चांगले काम सुरू केले, पण घटनेची पायमल्ली करून राज्यात आता आलेल्या मिंदे सरकारने बदला घेण्याचे काम सुरू केले आहे. याचा त्रास सर्वसामान्य मंडळींना आता होत आहे. त्यामुळे यापुढील सर्व निवडणुका काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेना या महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढविल्या जाणार असल्याचा निर्धार करण्यात आला आहे.आता भाजप आणि मोदी शहा हे दोनच आपले राजकीय शत्रू आहेत, असे श्री खोत यांनी सांगितले.
अमित सामंत म्हणाले की,सद्या जी राज्यांची राजकीय परिस्थिती उद्भवलेली आहे,त्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे,राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार,कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले या सर्व प्रमुख, मंडळींनी एका वेगळ्या हेतूने संपूर्ण देशात सत्ताधाऱ्यांकडून जो काही विरोधी पक्षाला त्रास दिला जातो, म्हणून एकत्र आले आहेत.सिंधुदुर्ग जिल्ह्यात या तिन्ही पक्षांची नुकतीच एकत्रित बैठक संपन्न झाली.या तिन्ही पक्षाचे सरकार परत आणण्यासाठी जिल्ह्यात महाविकास आघाडी एकत्रित लढणार आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्यावर जरी अन्याय झाला, तरी घटक पक्ष म्हणून तिन्ही पक्ष त्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे.
श्री संजय पडते म्हणाले कि, सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३२५ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत असून सर्व निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढविल्या जाणार आहेत तसेच यापूढे होणाऱ्या सर्व निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच एकत्रित लढल्या जाणार आहेत. त्यामध्ये आमदार, खासदारकीची निवडणूक सुद्धा अंतर्भूत राहील.आता मिंदे गटाला धडा शिकवण्यासाठी आम्ही सज्ज झालो आहोत तसेच येणाऱ्या ग्रा.प.निवडणुकीत महाविकास आघाडी आपला झेंडा फडविल असा विश्वास यावेळी श्री. पडते यांनी व्यक्त केला. यावेळी इर्शाद शेख म्हणाले की, गेल्या आठ वर्षात देशात असुरक्षितता वाटु लागली आहे, म्हणून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा सुरू केली आहे.या पदयात्रेला सर्वांनी चांगल्या प्रकारे उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन पाठिंबा दिला आहे. सध्या सत्ताधाऱ्यांकडून लोकशाही वर हल्ले होत आहेत.त्यामुळे ही लोकशाही वाचवण्यासाठी महाविकास आघाडी प्रयत्न करत आहे. आताच्या सत्ताधाऱ्यांनी पिक विमाचे शेतकऱ्यांना पैसे दिले नाही,त्यामुळे लोकांना न्याय देण्याचा महाविकासआघाडीच्या माध्यमातून प्रयत्न केला जाणार आहे.यावेळी सतीश सावंत म्हणाले की, जिल्हात यापुढे होणाऱ्या सर्व निवडणुका महाविकास आघाडी म्हणून एकत्रित लढणार आहोत. महाविकास आघाडीचे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी आमचे प्रयत्न राहणार आहेत.राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी केलेल्या वक्तव्यावर महाविकास आघाडीच्या वतीने आम्ही त्यांचा जाहिर निषेध करत असल्याचे सांगितले.
आघाडीची समन्वय समिती स्थापन करणार !
जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा स्तरावर एक समन्वय समिती काॅग्रेस अध्यक्ष इर्शाद शेख यांच्या नेतृत्वाखालील स्थापन केली जाणार असल्याचे अमित सामंत यांनी सांगितले, दरम्यान कुडाळ येथील खरेदी विक्री संघ निवडणुकीत महाविकास आघाडीकडे निवडणूक बिनविरोधचा प्रस्ताव आलेला नाही,तसा प्रस्ताव आल्यास विचार करु असे सांगितले.
