चौकशी समितीचा फार्स दाखवून प्रकरण दडपले..मनसेचा गंभीर आरोप..
सिंधुदुर्ग /-
महिला व बाल रुग्णालय कुडाळ येथे बाह्यस्त यंत्रणेद्वारा कंत्राटी पद्धतीने नियुक्त केलेल्या उमेदवारांकडून तीन ते चार महिन्यांच्या पगाराची आगाऊ रक्कम घेऊन नियुक्ती दिली जातेय अशा तक्रारी मनसेकडे प्राप्त झाल्यानंतर मनसेने सखोल चौकशीची मागणी केलेली होती. काही सामाजिक कार्यकर्त्यांकडून देखील अशा पद्धतीचे आरोप झाले होते. मागील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत विद्यमान खासदार विनायक राऊत यांनी देखील कंत्राटी भरतीत गोलमाल झाल्याने चौकशीची मागणी केली होती.
नियुक्ती प्रक्रियेत आर्थिक देवाण-घेवाणीचे आरोप झाल्याने जिल्हा रुग्णालयाने या सगळ्याची गंभीर दखल घेऊन चौकशीची प्रक्रिया राबविली खरी मात्र तो फक्त बनाव होता आणि फक्त नावापुरता चौकशीचा फार्स दाखवून प्रकरण अक्षरशः दडपले अशी धक्कादायक माहिती समोर येत आहे. मुळात या प्रकरणात जिल्हा रुग्णालयातील काही कर्मचारी एजंट म्हणून काम करत असून त्यांचेमार्फतच पैशांची वसुली केली जातेय असे आरोप असताना जिल्हा रुग्णालय प्रशासनाने निवासी वैद्यकीय अधिकारी, कार्यालयीन अधीक्षक व वरिष्ठ लिपिक यांचीच समिती गठित करून चौकशीचा बनाव केला असे दिसून येत आहे.
वास्तविक चौकशी प्रक्रिया राबवत असताना तक्रारदारांचे म्हणणे देखील जाणून घेणे नियमाधीन असताना चौकशी समितीने चक्क नियुक्ती मिळालेल्या 35 कार्यरत कर्मचाऱ्यांचा लेखी जबाब घेऊन प्रकरण दडपले अशी माहिती मिळते. मुळात कंत्राटी भरतीची जाहिरात व प्रसिद्धी कोणत्या मार्गाने करण्यात आली, उमेदवार संबंधित एजन्सीपर्यंत कसे पोहोचले, उमेदवार निश्चित करताना कोणते निकष तपासले, मुलाखती घेण्यात आल्या का, अनुभव पडताळणी करण्यात आली का अशा विविध घटकांची मुद्देनिहाय सखोल चौकशी करणे चौकशी समितीने आवश्यक होते. मात्र तसे न करता सदरचे प्रकरण मिटवण्यामागे नेमके कोणाचे हितसंबंध जोपासले गेले असा सवाल उपस्थित होत आहे. जिल्हा रुग्णालयाने देखील निव्वळ चौकशीचा फार्स दाखवून प्रकरण कोणाच्या दबावाखाली दडपले, जिल्हा शल्यचिकित्सकांवर कोणाचा दबाव होता का याचा खुलासा होणे आवश्यक असून जिल्हाधिकारी याची गंभीर दखल घेणार का असा सवाल मनसे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे उपस्थित केला आहे.
